Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह ठाणे पालघर या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तसेच रत्नागिरी, वर्धा, बुलढाणा आणि लातूर जिल्ह्यातही पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.  हवामान विभागानं कालपासून पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा व्यक्त केला आहे. दरम्यान, आणखी पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.


रत्नागिरी पाऊस


मागील आठ दिवसापासून गायब असलेल्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. रात्रीपासून जिल्ह्याचा अनेक भागांमध्ये पाऊस बरसत आहे. कोसळणाऱ्या सरी या जोरदार आहेत. सध्या देखील जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रात्री उशिरा जिल्हा माहिती कार्यालयाने जगबडीबाबत  दिलेली माहिती आहे. पाऊस पडत असला तरी जिल्ह्याच्या जनजीवनावरती मात्र कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.


वर्धा जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला


वर्धा जिल्ह्यात संततधार पावसामुळं जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.कारंजा तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. सावरडोह बेलगाव सुसुंद्रा खापरी ढगा या गावांचा संपर्क तुटला आहे.


लातूरता जोरदार पावसाला सुरुवात


लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं हातात आलेली पिके पिवळी पडत आहेत. मागील पंधरा दिवसापासून लातूरमध्ये पाऊस सुरु आहे. दोन दिवसाच्या उघडीपीनंतर पुन्हा पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. लातूर शहर लातूर ग्रामीण औसा निलंगा उदगीर अहमदपूर जळकोट या भागात पावसाने हजेरी लावली आहे. अतिरिक्त होणाऱ्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. तसेच सोयाबीनवर गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.


राज्यात पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे. विदर्भात गडगडाटांसह पावसाची शक्यता
हवमान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देखील मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद, बीड, नगरसह 18 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.


राज्यात 8 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान 


जुन महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं होते. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्याला जलमय केले आहे. अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यात 8 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर  नांदेडमध्ये  तीन लाख हेक्टर तर वर्ध्यात 1 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 


अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे आठ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर सुमारे चार हजार हेक्टर जमिन खरडली गेली आहे. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नांदेड, हिंगोली, बुलढाण्यात आदी जिल्ह्यांत अतिवृष्टी व त्यानंतर उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.