Maharashtra Rain News : राज्यात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी कायम असून पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज (IMD Weather Update) वर्तवण्याता आला आहे. कुठे ढगाळ वातावरण तर, कुठे पाऊस (rain Updates) यामुळे बळीराज्याच्या (Farmers) चिंतेत मात्र वाढ झाली आहे. चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला आहे. काढणीला आलेली पिकं अवकाळी पावसामुळे वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. द्राक्ष बागायतदारांनाही याचा फटका बसला आहे.


दोन एकरातील हरभऱ्यावर फिरवला ट्रॅक्टर


यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. जोरदार अवकाळी पावसाने शेतातील हरभरा, ज्वारी, गहू आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तालुक्यातील कासारबेहळ येथील शेतकरी गजानन रामराव करे यांच्या शेत सर्वे नंबर 124 मधील दोन एकरमधील अवकाळी पावसामुळे हरभऱ्याची मोठे नुकसान झाले होते, त्या पावसामुळे रोग आल्यामुळे आणि कृषी विभागाचा पंचनामा झाला नाही. त्यामुळे हरभरा पिकावर अखेर शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवला आहे.


अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका


गोंदिया जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असुन या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा धान उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून शेतामध्ये उभे असलेले धानपिक व कापून झालेल्या धानपिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचीच दखल घेत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सोनू कुथे व गोंदिया जिल्ह्याचे कृषी विभागाचे अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी सोनू कुथे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले.


शेतीच्या पंचनाम्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी


सोसायटीचं कर्ज घेतलं, घरातील दागिने सावकाराकडं गहाण ठेवलं, त्यातून मिळालेले पैसे अपुरे पडलेत म्हणून नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून हातऊसनवारीवर पैसे घेतून भातपीकाची शेती कसली. मात्र, ऐन हातातोंडाशी आलेलं पीक मळणीसाठी शेतात कापून ठेवलं असताना भंडारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्यानं भात पिकांचं प्रचंड नुकसान झालं. आता आठवड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळीनं हजेरी लावली आणि उरल्यासुरल्या आशाही आता मावळल्यात झाल्यात. निसर्गाच्या दृष्टचाक्रत शेतकरी अडकला असताना आठ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही महसूल विभागाचे कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेत बांधावर पोहचले नाहीत, किंबहुना त्यांना विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळं किमान शेतीला लागवडीसाठी आलेला खर्च तरी, मिळावा यासाठी तातडीनं पंचनामे करावे आणि आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.


ढगाळ वातावरणामुळे बाजार समित्या ओस


गेल्या काही दिवसात वर्धा जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड परिसरात शेतकऱ्यांचा शेतमाल पोहचत नाहीय. त्यामुळे येथे शेतमालाची आवक मंदावली असल्याचं चित्र आहे. कुठे पाऊस त,र कुठे ढगाळ वातवरण याचा फटका शेतीमधील पिकासह घरी आणलेल्या शेतमालाला देखील बसतो आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजार समितीमध्ये आणणे शक्य नाही. त्यामुळंच वर्धा बाजार समिती परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.


द्राक्ष उत्पादकांनाही फटका


गेल्या आठवड्याभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर संकट निर्माण केलं आहे. अवकाळी पावसामुळे आता द्राक्षाचे घड कुजू लागल्याने द्राक्षे घड काढून टाकण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांच्या वर आली आहे. तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.