परभणी : राज्यातील काही भागांमध्ये पूर्व मौसमी पाऊस (Rain) तर काही भागांमध्ये मान्सूनचा (Monsoon) पाऊस बरसतोय. अजूनही मान्सूनला महाराष्ट्र (Maharashtra) व्यापायला दोन दिवस लागणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. मान्सूनच्या आगमनामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून बळीराजाही चांगलाच सुखावला आहे. शेतकरी शेतीची कामं सुरु करण्याच्या तयारीत आहेत. परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात आवाहन केलं आहे.


75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका


मान्सूनच्या आगनामुळे शेतकरी शेतीच्या तयारीला लागला आहे. शेतकरी लवकरच पेरणी सुरु करण्याच्या तयारीत आहेत. असं असताना कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीसंदर्भात आवाहन केलं आहे. प्रत्येक ठिकाणी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असं आवाहन परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केला आहे. परभणी कृषी मौसम आणि हवामान विभाग आणि वनामकृवी विभाग प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी शेतकऱ्यांना हा सल्ला दिला आहे.


शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये


येत्या दोन दिवसांमध्ये राज्यभरातील सर्वच भागांमध्ये मान्सून चांगल्या प्रकारे बरसणार आहे. त्यानंतर परत तीन-चार दिवसांचा खंड पडणार आहे. या खंडानंतर परत चांगला पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, जून महिन्यामध्ये यावर्षी सर्वांच्या पेरण्या सर्वांच्या अशा पद्धतीनेच होणार आहेत. आपल्याकडे पाऊस बरसणार आहे, म्हणून आताच शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये, आपापल्या भागामध्ये 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी केलं आहे. 


येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज


मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.