पंढरपूर : परतीच्या पावसाने राज्यभरातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. मात्र यातूनही मोठ्या कष्टाने आणि हुशारीने ज्यांनी आपल्या डाळिंब बागा (Pomegranate) वाचवल्या त्यांना चांगला भाव मिळणे अपेक्षित असताना आर्थिक अडचणीत असलेल्या बांगलादेशने आयात कर वाढवल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. खरेतर या परतीच्या पावसात ज्यांच्या बागा वाचल्या त्यांना सोन्याचे भाव मिळतील अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने बागा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फवारण्या झाल्याने डाळिंब युरोप बाजारात जाऊ शकत नसल्याने बांगलादेशमध्ये निर्यातीस सुरुवात झाली. मात्र बांगलादेशने आयात करात प्रचंड वाढ केल्याने येथील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे भावात कपात करण्यास सुरुवात केली आहे . 


गेल्यावर्षी बांगलादेशमध्ये 56 रुपये प्रति किलो एवढा कर भरावा लागत होता. चालू वर्षी हंगाम सुरु होताना हा कर 80 रुपये प्रति किलो झाला आणि आता हाच कर 100 रुपये झाल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या डाळिंब भावात 30 ते 40 रुपयाची कपात केली असल्याचे निर्यातदार दत्तात्रय यादव यांनी सांगितले. यामुळे एका डाळिंब क्रेटला 2100 रुपये एवढी ड्युटी भरावी लागत असल्याने दुपदे यांच्या बागेतील डाळिंब बांगलादेशमध्ये 221 रुपये प्रति किलो एवढ्या भावात जाणार आहे . 


यंदाच्या परतीचा पाऊस माळशिरस तालुक्यातही जोरदार बरसला होता. कोळेगावच्या दुपडे कुटुंबाने पाऊस सुरु होताच बागा वाचवण्यासाठी बागेत चऱ्यो खोदून पाणी तातडीने बाहेर जाण्याची व्यवस्था केली होती. तरीही झाडांवर या पावसाचा परिणाम  होणार  म्हणून सातत्याने विविध रासायनिक फवारण्या सुरु ठेवल्या . खरेतर संग्राम दुपदे याने आपल्या बागेला सुरुवातीला संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने जोपासले होते . यासाठी अत्यंत कमी पाण्याचे नियोजन आणि ड्रीपमधून सेंद्रिय शेणखताची स्लरी दिली जात होती. याचा परिणाम म्हणून संग्राम यांच्या बागेतील झाडे लाल चुटुक डाळिंबाने लगडून गेली होती. एक एक फळ अर्धा किलो पेक्षा मोठे असल्याने बांग्लादेशच्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीला ही बाग 160 रुपये दराने घेण्याचे ठरवले होते. मात्र आर्थिक संकटात असणाऱ्या बांगलादेशने पुन्हा करात वाढ केल्याने ही बाग 121 रुपये प्रति किलो भावाने विकत घेऊन त्याची तोडणी सुरु केली आहे.


पहिल्या टप्प्यात किमान 25 टन माल आत्तापर्यंत उतरविला असून दुपडे याना यातून 30 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे . अजूनही याच बागेतून किमान 10 टन एवढा माल येणार आहे. मात्र एवढ्या कष्टाने बाग वाचवून आणि निर्यातक्षम फळाचे उत्पादन घेणाऱ्या संग्रामसारख्या अनेक शेतकऱ्यांना बांग्लादेशच्या वाढत्या आयात कराचा फटका बसू लागला आहे. केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी बोलून हा आयात कर कमी करण्याची विनंती केल्यास याचा फायदा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे .