नाशिक: देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याचा भाव हा एक ते दहा रुपयांपर्यंत मिळत आहे. पण कांद्याचा उत्पादन खर्च हा 15 ते 20 रुपये इतका असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागत आहे.
मुंबई कृषी उत्पन बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या वर्षी कांद्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर झालं आहे. पूर्वी कांद्याचं उत्पादन हे कमी प्रमाणात घेण्यात येत होतं. अलिकडे या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. गेल्या 10 वर्षामध्ये राज्यातील कृषी उत्पन्न समित्यामध्येही वाढ झाली आहे.
राज्यामध्ये कांदा साठवणूक करण्यासाठी स्टोरेजची सुविधा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे भाव मिळत नसताना तो कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. याचाच फायदा अडते घेत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक केली जाते. यामुळे काही वेळा शेतकऱ्यांना 50 पैशांनीही कांदा विक्री करावी लागते. बहुतांशवेळी उत्पादन खर्चही निघत नसल्याने हा कांदा शेतकऱ्यांना रडवतोय.
औरंगाबादमध्ये कांद्याला 75 पैसे दर
औरंगाबादच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसांत 7 हजार 851 क्विंटल कांद्याची आवक झाली. परिणामी किमान 75 रुपये प्रतिक्विंटल म्हणजे 75 पैसे किलो नीचांकी भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहेत.
वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. मात्र त्याप्रमाणे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. मशागत, बी-बियाणे, लागवड, निंदणी, खते, काढणी असा एकरी उत्पादन खर्च 30 हजार रुपयांपर्यंत वाढला. तर यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना आवक वाढल्याने दर पडले आहे. त्यामुळे खर्च वाढला पण उत्पनातून होणार नफा काही वाढू शकला नसल्याचे चित्र आहे.
राज्यातील विविध ठिकाणचे आजचे कांद्याचे भाव (प्रति क्विंटल)
लासलगाव
500 ते 1330 रुपये
नागपूर
800 ते 1000 रुपये
अमरावती
100 ते 700 रुपये
येवला
125 ते 905 रुपये
पिंपळगाव
300 ते 1000 रुपये
देवळा
100 ते 1255 रुपये