पिंपरी- चिंचवड : राज्यात आजपर्यंत झाली नाही, इतकी यंदा ऊसाची विक्रमी लागवड झाली आहे. पण तोडणी मात्र अद्याप ही पन्नास टक्के रखडली आहे. परिणामी ऊसावर तुरे उगवल्याने शेतकरी हतबल झालाय. कारण या तुऱ्यामुळं उसाचं थेट पन्नास टक्के वजन घटत आहे. राज्यातील 547 लाख टन उसाचं गाळप अजून होणार आहे.  हा विचार केला तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास टक्के नुकसान हे ठरलेलं आहे. याला निसर्गाच्या लहरीपणाचं कारण देत कारखानदार कोट्यवधींची साखर घशात घालू पाहतायेत. 


 पुण्याच्या मावळ तालुक्यातील तरुण ऊस उत्पादक शेतकरी अमोल राक्षे हतबल झालेत. सहा एकर क्षेत्रातील ऊसावर तुरे उगवल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. या तुऱ्याने उभ्या ऊसात पोकळी निर्माण केलीय आहे.  परिणामी उसाचं वजन पन्नास टक्के घटलंय. त्यामुळं चारशे टन ऐवजी आता दोनशे टनच ऊस अमोलच्या हाती येणार आहे.  प्रति टन अडीच हजार रुपये धरले तर पाच लाख रुपयांचा भूर्दंड हा ठरलेला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचं याला कारण असलं तरी ऊस तोडणी दोन महिने लांबणीवर पडल्याचे देखील परिणाम आहेत. 


सांगली जिल्ह्यातील पद्माळे गावचे प्रमोद पाटलांच्या पदरी देखील तीच निराशा आहे. लागवडीपासून बारा ते तेरा महिन्यात त्यांच्या उसाची तोड अपेक्षित होती. पण आता सोळा महिने होत आले तरी ऊस शेतातच उभा आहे. परिणामी उगवलेल्या तुऱ्यांमुळं चार एकरातून अवघे दीडशे टन ऊस हाती येणार आहे.  म्हणजे चार ते पाच लाखांचं नुकसान त्यांना झेलावं लागणार आहे. 


 राज्यात यंदा साडे बारा लाख हेक्टर क्षेत्रावर तब्बल 1096  लाख टन ऊसाची लागवड झाली आहे. आजवरची ही विक्रमी लागवड असल्याचं साखर आयुक्तांचं म्हणणंय. यातील 547 लाख टन उसाचं गाळप झाल्याने, यंदाचा गळीत हंगाम ही व्यवस्थित असल्याचा त्यांचा दावा आहे.  साखर आयुक्त शेखर गायकवाड एकीकडे हा दावा करता आहेत.  पण दुसरीकडे पुण्याच्या मावळ तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील आकडेवारी बरंच काही सांगून जाते.  


 सांगली जिल्ह्यात तोड राहिलेल्या 49 हजार 150  हेक्टर म्हणजे 1 लाख 22 हजार 875 एकर लागवडीवर तुरे उगवले आहेत. यातून चार लाख टन ऊसाचे उत्पादन अपेक्षित होते, मात्र तुऱ्यामुळं पन्नास टक्के वजन घटले तर ते 21 लाख 50 हजार टन इतके उत्पादन हाती लागेल. म्हणजे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा पाचशे कोटींच्या घरात जातो. 


 मावळ तालुक्यात तोड राहिलेल्या 700 हेक्टर लागवडीवर म्हणजे 1750 एकरवर तुरे उगवलेत. 1750 एकरमध्ये 61250 टन ऊस अपेक्षित आहे. पन्नास टक्के वजन घटले तर 30, 635 टन ऊस भरेल म्हणजे साडे सात कोटींचा शेतकऱ्यांना तोटा होणार आहे.  जी परिस्थिती या दोन ठिकाणी आहे तीच राज्यातील प्रत्येक क्षेत्रात पहायला मिळते. मग तोट्याच्या या आकड्यांचा विचार न केलेलाच बरा. 


 ऊसाच्या लागवडीनंतर त्याची तोडणी साधारण 10 ते 12 महिन्यांनी अपेक्षित असते. पण साखर कारखानदार ही तोडणी दोन ते तीन महिने लांबणीवर टाकतात. त्यामुळे उसावर तुरे उगवतात अन् ते उभ्या ऊसाला पोकळ करतात. परिणामी ऊसाच्या वजनात किमान पन्नास टक्क्यांनी घट होते. साखरेची मात्र शंभर टक्के निर्मिती होते. शेतकऱ्यांचा हा दावा यामागचं आर्थिक गौडबंगाल समोर आणतोय.


राज्यात 95 सहकारी आणि 95 खासगी साखर कारखाने आहेत. प्रत्येक कारखानदारांकडून असंच केलं जात असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार यंदा ऊसाची लागवड ही विक्रमी झाली आहे. त्यानुसार यातून साखरेची होणारी निर्मिती आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे विक्रमी असणं अपेक्षित आहे. मात्र साखर कारखानदाऱ्यांकडून या तुऱ्याचं कारण पुढं केलं जातं आणि ही विक्रमी उलाढाल लपविण्याचे धंदे त्यांच्याकडून केले जातात. असं अनेकदा बोललं गेलंय. परंतु यामुळं प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका ही बसतो. याचाच परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे देशाच्या अर्थकारणावर ही पडतो.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या: