Bhandara Agriculture News : देशाच्या विविध भागात अनेक प्रयोगशील शेतकरी (Experimental Farmer) आपल्याला पाहायला मिळतात. विविध संकटांचा सामना करत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भरघोस उत्पादन घेत आहेत. शेतीत अनेक शेतकरी वेगवेगळी जुगाड करत पिकाला जगवत असतात. असचं एक वेगळ्या प्रकारचं जुगाड भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं केलं आहे. देशी दारुच्या (Desi Daru) जुगाडानं शेतकऱ्यानं भात पिकाची नर्सरी (Nursery of Rice crop) जगवली आहे. रासायनिक खतांच्या (Chemical fertilizers) अनाठायी खर्चाला बगल देत शेतकऱ्यानं अनोख जुगाड केलं आहे. 


मरणासन्न अवस्थेतील नर्सरीतील रोपांना रोगमुक्त करत पिकाला नवसंजीवनी


दारुमुळं आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आपल्या सर्वांनाच बघायला मिळतात. मात्र, भंडाऱ्यातील जेवनाळा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रमोद भुते यांनी भात पिकाच्या नर्सरीवर चक्क देशी दारूची फवारणी करून मरणासन्न अवस्थेतील नर्सरीतील रोपांना रोगमुक्त करत पिकाला नवसंजीवनी दिली आहे. सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांनी भुते यांची टिंगल टवाळी केली होती.  मात्र, आता तेच शेतकरी त्यांची भात पिकांची नर्सरी बघायला शेतात येत आहेत.


 


बदलत्या वातावरणाचा तांदळाच्या नर्सरीवर झाला होता परिणाम


भंडारा हा तांदूळ उत्पादक जिल्हा असून या जिल्ह्यात वर्षभरात तीन वेळा भात पिकाची लागवड केली जाते. खरीप हंगामनंतर आता रब्बी पिकांची लागवड सुरू झाली आहे. उन्हाळी धान रोवणीसाठी नर्सरीची तयारी सुरू आहे. मागील 15 दिवसांपूर्वी वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल निर्माण होऊन, कडक्याच्या थंडीमुळं पिकांवर परिणाम दिसून आला. बदलत्या वातावरणाचा तांदळाच्या नर्सरीवर विपरीत परिणाम झाला आहे. भाताचे पऱ्हे पिवळे पडून किडग्रस्त होऊन मरणासन्न अवस्थेत होते. त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक औषधींची मोठ्या प्रमाणात फवारणी केली. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम जाणवला नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. 


भाताची नर्सरी आता हिरवीगार


लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील शेतकरी प्रमोद भुते यांनी भात नर्सरीतील रोपांवर चक्क पाण्याच्या मिश्रणाने देशी दारूची फवारणी केली. त्यानंतर काही दिवसातच त्याचा परिणाम जाणवू लागला. जी भात नर्सरी मरणासन्न अवस्थेत होती, तीच आता भाताची नर्सरी आता हिरवीगार असून डौलात उभी आहे. देशी दारूच्या जुगाडानं भाताची नर्सरी भुते यांनी जगवली आहे.


अन्य शेतकरी देखील हा प्रयोग करण्यास उत्सुक 


कृषी क्षेत्रासाठी हा प्रयोग नवा नाही. मात्र, कोणत्याही कृषी विद्यापीठाने पिकावर मद्य प्रगोगाला अधिकृत मान्यता दिलेली नाही. मात्र, जेवनाळा येथील शेतकऱ्याने केलेला प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळं अन्य शेतकरी देखील असा प्रयोग करण्यास उत्सुक आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


भंडाऱ्यातील महिला शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! ड्रोनद्वारे केली कीटकनाशक फवारणी