Urban Naxalism Case: शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले विचारवंत गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे पुरावे आहेत. असं निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष एनआयए कोर्टानं (Special NIA Court) त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. हायकोर्टाच्या (High Court) निर्देशांनंतर विशेष एनआयए कोर्टानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयावर पुन्हा सुनावणी घेतली होती. नवलखा सध्या नवी मुंबईतील (Mumbai News) घरात नजरकैदेत आहेत. 


नवलखा यांनी नियमित जामीनासाठी केलेला अर्ज विशेष एनआयए कोर्टानं नामंजूर केला होता. त्याला नवलखा यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. यावर पुन्हा सुनावणी घेत तातडीनं निकाल देण्याचे आदेश हायकोर्टानं एनआयए कोर्टाला दिले होते. त्यानुसार एनआयए कोर्टानं यावर नव्यानं सुनावणी घेत नवलखा यांचा जामीन पुन्हा फेटाळून लावला. या निकालाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली. ज्यात गौतम नवलखा यांचा जामीन फेटाळताना एनआयए कोर्टानं तीव्र ताशेरे ओढले आहेत.


नवलखा हे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सदस्य होते असं निरीक्षण विशेष न्यायाधीश राजेश कटारिया यांनी आपल्या निकालात व्यक्त केलं आहे. देशासाठी लढणाऱ्या अनेक संरक्षक जवानांना या संघटनेनं ठार मारलेलं आहे. तपासयंत्रणेनं याबाबत दाखल केलेल्या आरोपपत्रातील कागदपत्रांवरुन नवलखा या संघटनेचे सक्रिय सदस्य होते असं दिसतंय. नवलखा यांच्याकडून अनेक कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आरोपपत्रात असलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होतंय की, नवलखा हे या गुन्ह्यात आणि कटकारस्थानातही सहभागी होते. याशिवाय अन्य आरोपींप्रमाणे ते शस्त्रास्त्र प्रशिक्षणातही सामील होते असं निरिक्षणही कोर्टानं नोंदवलं आहे.


काश्मिर मुक्त संघटनेचा सय्यद गुलाम नबी फई याच्यासोबत नवलखा यांचे संबंध असल्याचा आरोपही एनआयएनं केला आहे. आरोपपत्रात केलेल्या दाव्याचा परामर्श न्यायालयाने घेतला आहे. एकूण सर्व परिस्थिती पाहता नवलखा यांचा सहभागाबाबत पुरेशी कारणे उपलब्ध आहेत, ज्यामुळे त्यांच्यावरील आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याचं न्यायालयानं आपल्या निकालांत म्हटलेलं आहे. 


नजरकैदेत मोबाईल वापरावरही बंदी


नजरकैदेत असताना नवलाखा यांना इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप, आयपॅड किंवा इतर कोणतंही संपर्काचं साधन वापरण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली आहे. आरोपी नवलाखा यांना दिवसातून एकदाच 10 मिनिटांसाठी सुरक्षा रक्षकांनी दिलेला फोन वापरण्यास परवानगी असणार आहे. त्याशिवाय, त्यांच्या जोडीदार साहबा हुसैन यांनादेखील इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसणार मोबाईल फोन वापरण्याची सूचना केली आहे.