Pune Bypoll Election 2023:  पुण्यातील कसबा (kasba peth), चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणूक तारखेत बदल करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी ऐवजी 26 फेब्रुवारीला पोटनिवडणुकसाठी मतदान होणार आहे. बारावीच्या परीक्षांमुळे मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आसल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालाच्या तारखेत बदल करण्यात आला नाही आहे. निकाल 2 मार्चलाच लागणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने पत्र प्रसिद्ध करत दिली आहे. 


पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार होतं. मात्र या तारखेत आता बदल करण्यात आला आहे. आता 26 तारखेला मतदान होणार आहे. बारावीची परीक्षा आणि मतदार एकाच दिवशी आल्याने या तारखेत बदल करण्यात आल्याचं पत्राद्वारे सांगण्यात आलं आहे. 


या निवडणुकीसाठीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 8 फेब्रुवारीला अर्जांची छाननी तर 10  फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी मतदान 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे.  या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे


निवडणुका बिनविरोध नाहीच...


दोन्ही मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी निवडणूक बिनविरोध होण्यावर शाशंकता दर्शवली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची यादी वाढत आहे. त्यामुळे आता उमेदवारी कोणाला मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


भाजपचा उमेदवार दिल्लीतून ठरणार...


दोन दिवसांपूर्वी कसबा मतदार संघासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपनेते यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कसबा मतदार संघासाठी उमेदवार निश्चित होईल असं वाटत होतं. मात्र या बैठकीत उमेदवार निश्चित झाला नाही. पक्षाने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून त्यासाठी तीन समित्या नेमल्या आहेत. त्यामुळे कसब्याच्या उमेदवाराची बैठकीनंतर घोषणा करण्यात आली नाही. आज (25 जानेवारी) चिंचवड मतदार संघासाठी भाजपकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दुपारी एक वाजता पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप ही उपस्थित असणार आहेत. या चिंचवडच्या बैठकीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.