Pune Bypoll election : पुण्यात पोटनिवडणुकांची (Kasba Bypoll Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपकडून ओंकारेश्वर मंदिरात आरती करुन भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या निवडणुकीचा शुभारंभ झाला आहे.  या प्रचारासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. हेमंत रासने हे सत्तेसाठी नाहीतर सत्य आणि विकासासाठी लढणार आहे, असा विश्वास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी टिळक कुटुंबीयदेखील प्रचार यात्रेत सहभागी झाले होते. 



मुनगंटीवार म्हणाले की, हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेल्या नेत्यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. त्यांची लढाई खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी आहे मात्र हेमंत रासने यांची लढाई ही सत्य आणि विकासासाठी आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे. राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आहे. कसब्याच्या मतदारांना आवाहन करतो की भाजप जनतेची सेवा करण्याचं काम करते आहे. त्यामुळे हेमंत रासने यांना कसब्याच्या मतदारांनी निवडून द्यावं. पुण्याचे मुलभूत प्रश्न आणि पुण्याची शान वाढवण्यासाठी भाजपने हेमंत रासने मेहनत करतील. त्यासोबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार रासनेंच्या पाठिशी आहे, असंही ते म्हणाले. 


टिळक कुटुंबीयांची नाराजी दूर?


पोटनिवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने टिळक कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या प्रचार सभेत टिळक कुटुंबीय सहभागी झाले आहेत. आमची कोणतीही नाराजी नाही आम्ही धुमधडाक्यात प्रचार करणार आहोत, अशी प्रतिक्रिया कुणाल टिळकांनी दिली आहे 


उद्धव ठाकरेंची सत्ता होती तेव्हा राज्य दहशतीखाली होतं...


 2020 आणि 2021 साली राज्यातील जनता दहशतीखाली होती.  विश्वासघात करुन आणि जनतेच्या मनाचा अनादर करुन ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्याचवेळी महाराष्ट्रात दहशतवाद होता, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे कायम भावनिक साद घालत असतात. बाळासाहेब ठाकरे वडिल आहे म्हणून शिवसेना आमची, असं ते म्हणत असतात. त्याचे बाकी दोन सुपुत्रदेखील बाळासाहेबांचेच आहेत. मात्र ते शिंदे गटात आहेत. ते जर शिंदे गटात राहून शिवसेनेचा वारसा चालवत असतील तर त्यात वावगं असं काही नाही. एका मुलाने चालवलेली शिवसेना आणि शिंदे गटात दोन मुलांनी चालवलेली शिवसेना नाही ही कोणती कौटुंबिक व्यवस्था निर्माण झाली, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. 


दाढी वाढवून कोणी पंतप्रधान होऊ शकत नाही; कॉंग्रेसला टोला


दाढी वाढवून कोणी पंतप्रधान होऊ शकत नाही. बुद्धी वाढवल्याने पंतप्रधान होत असतो. कॉंग्रेस अदानींच्या विरोधात आंदोलन करतात. मात्र अदानी केव्हा मोठा झाला हे विरोधकांना माहिती नाही. 1993 मध्ये जमीन तुम्ही दिली. कबीरदास मेहता जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा मुद्रा पोर्टचं काम त्यांना तुम्ही दिलं. 1988 मध्ये जेव्हा अदानींने काम सुरु केलं होतं तेव्हा कोणाचं सरकार होतं. या सगळ्या खोट्या माहिती लोकांपर्यंत पोहचवून कॉंग्रेसला फक्त सत्ता स्थापन करायची आहे, असा टोला त्यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.