Agriculture News : नाफेडकडून शासकीय हरभरा (Gram) खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी आजपासून (27 फेब्रुवारी) सुरु होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. दरम्यान, हरभरा विकण्यासाठी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात (Dhamangaon Railway) शेतकऱ्यांच्या काल (26 फेब्रुवारी) दुपारी दोन वाजल्यापासून भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. या शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीची नोंदणी करण्यासाठी रस्त्यावर रात्र जागून काढली.


हरभऱ्याचा हमीभाव 5 हजार 300 रुपये


नाफेडकडून शासकीय हरभरा खरेदीची ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु होणार आहे. हरभरा विकण्यासाठी धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. काल दुपारपासून शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. नाफेडकडून आज सकाळी आठ वाजता शासकीय हरभरा खरेदीची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. हरभऱ्याचा हमीभाव हा 5 हजार 300 असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच नोंदणी करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. 


हमीभावापेक्षा बाजारात हरभऱ्याला कमी दर 


सध्या शेतकऱ्यांचा हरभरा घरात पडून आहे. बाजारात 4 हजार 200 ते 4 हजार 400 रुपये दर मिळत असल्याने सगळ्या शेतकऱ्यांचा कल नाफेडकडे आहे. कारण नाफेडचे हमीभाव हे 5 हजार 300 रुपये असल्याने प्रत्येक शेतकरी आपला हरभरा याठिकाणीच विकण्यासाठी येत आहे. दरम्यान, धामणगाव रेल्वे शहरात नोंदणी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर रात्र जागून काढली. शेतकऱ्यांच्या रांगा पाहून सकाळी पोलिसांच्या बंदोबस्तात नोंदणी होण्याची शक्यता आहे.


राज्यात एकूण 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड


यावर्षी राज्यात एकूण 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा हरभरा पिकासाठी वातावरण देखील चांगले असल्याने उत्पादनही चांगले निघत आहे. परंतु उत्पादित हरभरा विकायचा कुठे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. कारण नाफेडच्या वतीने हरभरा हमीभावाने खरेदी केला जातो. परंतु या खरेदीची नोंदणीच अद्याप सुरु झाली नव्हती. त्यामुळे हरभऱ्याची खरेदी कधी सुरु होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात होता. परिणामी नाईलाजास्तव शेतकरी हरभरा मार्केटमध्ये विकत होते. बाजारात हरभऱ्याला कमी दर मिळत होता. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता. त्यामुळे नाफेडकडून हरभरा खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार आजपासून अमरावती जिल्ह्यात हरभरा खरेदी नोंदणी सुरु झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : हरभरा खरेदी केंद्र कधी सुरु होणार? अद्याप नाफेडकडून नोंदणी नाही; हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत