भंडारा : मुख्यमंत्री साहेब मागील वर्षापासून उत्पन्न होत नसल्याने शेती परवडत नाही म्हणून किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली न तशीच परवानगी आम्हालाही द्या," अशी अजब मागणी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या शेतकऱ्याने तशा आशयाचा पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. जयगुनाथ गाढवे असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या या अजब मागणीची चर्चा जिल्हाभर सुरु आहे.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील निलज बु. या गावात जयगुनाथ गाढवे हे राहतात. निलज बु. परिसरात ऑक्टोबर 2021 मध्ये चक्रीवादळ आले होते. त्यात जयगुनाथ यांच्यासह गावातील अनेक शेतकऱ्यांची धानाची शेती भुईसपाट झाली होती. पंचनामे झाले तरी एवढे दिवस लोटूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई मिळालेली नाही. या प्रकरणी गावातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांसमोर कैफियत मांडून तातडीने नुकसान भरपाईची देण्याची मागणी केली. परंतु या विषयावर सरकारने अजूनही कोणताही तोडगा काढलेला नाही.
हे कमी होतं की काय सरकारने मागील वर्षीपासून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणं बंद केलं. या अडचणींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक चटके बसत असल्याचं जयगुनाथ गाढवे यांचं म्हणणं आहे. शेतात पीक घेताना लागत असलेले खत, युरिया आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यात ताळमेळ बसत नाही. तर दुसरीकडे मुलांचा शैक्षणिक खर्च, कुटुंबाच्या आरोग्यावर होणारा खर्च हे सर्व शेतीच्या उत्पन्नामधून करणे शक्य होत नाही. त्यामुळे हताश झालेल्या जयगुनाथ गाढवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. "मुख्यमंत्री साहेब आपण किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली तशी मलाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लवकरात लवकर वाईन विक्रीची परवानगी मिळावी," अशी मागणी गाढवे यांनी पत्रात केली आहे. जयगुनाथ गाढवे यांनी हे पत्र स्पीडपोस्टने मुख्यमंत्र्यांना पाठवलं.
आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चक्क वाईन विक्रीची परवानगी मागण्यासाठी भंडाऱ्यातील शेतकऱ्याने पत्र पाठवल्याने त्याच्या अजब मागणीची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे. खरंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जयगुनाथ गाढवे यांच्या पत्राची दखल घेतील का? की सरकार 2021 मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई देईल हे पाहावं लागेल.