Devendra Fadnavis : कृषी पंपाच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहेत. शेतकरी देखील सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. अशातच आज सभागृहात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज तोडणीचा मुद्दा उपस्थित केला. या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिलं होत की, कृषी पंपाचे चालू बील भरलं तरी विजपुरवठा खंडीत केला जाणार नाही. मग आता वीज कनेक्शन का कट करत आहेत असा सवाल फडणवीस यांनी केला. वीज कट करणार नाही, अशी घोषणा करा असे ते म्हणाले. मंत्री महोदय दिशाभूल करत आहेत, हा चालूपणा चालणारं नाही. नाहीतर आम्ही अजित पवारांच्या विरोधात उद्या हक्कभंग आणणार असल्याचा इशाराच फडणवीस यांनी दिला.


शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी तत्काळ थांबण्याचे आदेश सरकारने द्यावेत, अशी मागणी यावेळी फडणवीस यांनी केली. या सरकारमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. सध्या राज्यात सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी सुरु असल्याचे फडणवीस म्हणाले.


यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगितले. मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाही. या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाही असे म्हणत फेसबुक लाईव्ह करत त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे फडणवीस म्हणाले. मी त्या शेतकऱ्याच्या घरच्यांशी बोललो आहे. ज्यावेळी पिकाला पाण्याची आवश्यकता होती, त्यावेळी कृषीपंपाची वीज कट केली असल्याचे शेतकऱ्याच्या घरच्यांनी सांगितले. बीडमध्ये देखील एका शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याचेही कृषी पंपाचे कनेक्शन कापलं होतं असे फडणवीस यावेळी म्हणाले.


उपमुख्यमंत्र्यांचे ऊर्जामंत्री ऐकत नाहीत


दररोज शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा सुरु आहे. अशात शेतकरी आत्महत्या करत आहेत. काही शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत. मागील अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, आम्ही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कट करणार नाही. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे ऊर्जामंत्री ऐकत नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. ऊर्जामंत्री जाहीर बोलतात की वीज बील भरले नाही तर वीज कट करु असेही फडणवीस म्हणाले. 


सध्या राज्यात सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी सुरु आहे.  या राज्यामध्ये फेसबुक लाईव्ह करुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ सरकारमुळे येत आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की, तत्काळ वीज तोडणी थांबवावी. अधिवेशन सुरु असताना शेतकऱ्याने आतम्हत्या केली आहे. मग चर्चा कुठे करायची? असा सवालही फडणवीस यांनी केला. त्यामुले याक्षणी तत्काळ वीज तोडणी थांबण्याचे आदेश द्यावेत असे फडणवीस यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: