Jamin Mojani News : जमिन मोजणीच्या (Jamin Mojani) संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जमीन मोजणीच्या प्रकार आणि मोजणी फीमध्ये सुसंगतता यावी यासाठी आजपासून वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. मोजणीच्या प्रकारामुळं निर्माण होणार संभ्रम व वाढता प्रशासकीय खर्च पाहता जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक कार्यालयाच्या वतीने यामध्ये बदल करण्यात आला आहे.
1 डिसेंबरपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले, त्यांना जुन्याच पद्धतीने आकारणी होणार
नियमीत आणि दूतगती, अशा दोन प्रकारांमध्ये जमीन मोजणी करण्याचा कालावधीही निश्चित करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. आता नियमित आणि दूतगती, अशा दोन प्रकारांत जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. साधी, तातडी, अतितातडी आणि अतिअतितातडीच्या जमीन मोजणीचा प्रकार आता निकाली निघाला आहे. जमिनी मोजणीची फी व दर बदलेले असले तरी 1 डिसेंबर पूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांना जुन्याच पद्धतीने आकारणी होणार आहे. तर 1 डिसेंबरनंतर अर्ज करणाऱ्यांना नवीन दराने आकारणी केली जाईल, अशी माहिती भूमी अभिलेख कार्यालयातील सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, 1 नोव्हेंबरपासून हे दर लागू होणार होते. परंतु, प्रशासकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, ती आता आज 1 डिसेंबरपासून होणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
किती राहणार मोजणी फी?
महानगरपालिका तसेच पालिका हद्दीबाहेरील क्षेत्रातील जमीन मोजणीसाठी 2 हेक्टर मर्यादेपर्यंत नियमित मोजणीसाठी 2000 रुपये आणि दूतगती मोजणीसाठी 8000 रुपये फी आकारली जाईल. दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी अर्थात उर्वरित क्षेत्रासाठी अनुक्रमे 1000 आणि 4000 रुपयाप्रमाणे आकरणी केली जाणार आहे. यासोबतच मनपा आणि पालिका हद्दीमधील क्षेत्रात एक हेक्टरचे मर्यादित 3000 रुपये दूतगतीसाठी 12 हजार रुपये आणि एक हेक्टर मर्यादापेक्षा अधिक क्षेत्रासाठी दीड हजार रुपये आणि दूतगतीसाठी 6 हजार रुपये असा दर राहील. कंपन्या, इतर संस्था, महामंडळे, भूसंपादन संयुक्त्त मोजणीसाठीचेही दर निश्चित केले गेले आहेत.
नियमीत मोजणीसाठी किमान 20 दिवसांचा कालावधी
नियमीत मोजणीसाठी किमान 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हा कालावधी अर्ज केल्यापासून गृहीत धरण्यात येणार आहे, तर दूतगती मोजणीसाठी कमाल 30 दिवसांचा कालावधी यापुढे रहाणार आहे. दरम्यान, जमिन मोजणीची प्रक्रिया करताना अनेक अडचणी येतात. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आणि तातडीने जमिनीची मोजणी पूर्ण करण्यासाठी आता भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळं आता वेगानं जमिनीची मोडणी करता येणं शक्यत होणार आहे.