Konkan Rains : कोकणात (Konkan) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात जवळपास 2 लाख 25 हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. दसऱ्यानंतर कोकणात भात (Rice) कापणीला सुरुवात होते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीत अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी भात पडून आहे. त्यावर पाऊस पडत असल्याने भाताला कोंब आले आहेत. त्यामुळे बळीराजाचे नुकसान होत आहे. भाताला शेतकऱ्याचं पिवळं सोन म्हटलं जातं. मात्र गेल्या चार महिन्यापासून मोठ्या कष्टाने पिकवलेलं भात पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा, शेतकरी हवालदिल 
परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. भात कापणीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडत असल्याने उभं भात आडवं झालं आहे. त्यामुळे पडलेल्या भाताला कोंब आल्याने ते भात निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या भाताचा काही उपयोग होणार नसल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.


पंचनामा करुन मदत करावी, अन्यथा आंदोलन करु, शेतकऱ्यांचा इशारा  
कोकणात अल्पभूधारक शेतकरी असल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेत नाहीत. त्यामुळे त्यांना सरकारकडून पंचनामा करुन मदत करावी. अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जमून आंदोलन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
एकीकडे परतीच्या पावसाचा फटका पिकांना बसत असतानाच जीवितहानी झाल्याची घटनाही सिंधुदुर्गात घडली आहे. कोकणात परतीचा पाऊस सुरु असून विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात अंगावर वीज कोसळून हनुमंत झोरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (11 ऑक्टोबर) पहाटे घडली. हनुमंत लघुशंकेसाठी बाहेर गेला होता. त्यावेळी त्याच्यावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.


राज्यभरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतीचं मोठं नुकसान
सध्या राज्यात परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. परभणी जिल्ह्यात पावसामुळे काढणीला आलेलं सोयाबीन (Soybean) पूर्णपणे पाण्यात गेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे तात्काळ पीक विमा आणि मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर सांगली जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच भुईमूग, भाजीपाला या पिकांना देखील फटका बसला आहे. या पावसाचा परिणाम द्राक्षांच्या बागांवर पाहायला मिळत आहे.