Kisan Samriddhi Kendra : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचं (Kisan Samriddhi Kendra) उद्घाटन झालं. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन 2022 चे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांच उद्घाटन केलं. तसेच पंतप्रधानांनी 'प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक  योजना - एक राष्ट्र एक खत' याचाही शुभारंभ केला.


नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विविध योजनांचा शुभारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी  थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) अंतर्गत  16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता देखील जारी केला. पंतप्रधानांनी  कृषी स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी 'इंडियन एज' हे खतावरील ई-मासिकही प्रकाशित केले. मोदींनी स्टार्टअप प्रदर्शनाच्या संकल्पना पॅव्हेलियनचा आढावा घेतला आणि प्रदर्शनातील उत्पादनांची पाहणी केली.


पंतप्रधनानांचा जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधानचा नारा


जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान (संशोधन) हे मंत्र एकाच प्रांगणात उपस्थित असल्याचे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. या मंत्राचे जिवंत रुप आपण येथे पाहू शकतो. किसान संमेलन हे शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करणं, त्यांची क्षमता वाढवणं आणि प्रगत कृषी तंत्राला चालना देणारे साधन असल्याचे मोदी म्हणाले. आज 600 हून अधिक प्रधानमंत्री समृद्धी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असल्याचे मोदी म्हणाले. ही केंद्रे केवळ खत विक्री केंद्रे नसून देशातील शेतकऱ्यांशी घट्ट नाते निर्माण करणारी यंत्रणा आहे असल्याचं त्यांनी सांगितलं. 


 किसान समृद्धी केंद्र शेतकऱ्यांना बळकट करतील


कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना 16,000 कोटी रुपयांचा आणखी एक हप्ताही पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपात जारी करण्यात आला आहे. दिवाळीच्या आधी हा हप्ता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना - एक राष्ट्र एक खत आज  सुरू केली आहे. भारत ब्रँडचे स्वस्त दर्जाचे खत शेतकऱ्यांना मिळण्याची सुनिश्चिती करणारी ही योजना आहे असं पंतप्रधान म्हणाले. कृषी क्षेत्रातल्या संशोधन कार्याला प्रोत्साहन देण्यात आल्यामुळे, नॅनो युरियाचे व्यावसायिक उत्पादन सुरू करणारा भारत जगातला पहिला देश बनल्याचे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले.  600 किसान समृद्धी केंद्र शेतकरी बांधवांना अनेक प्रकारे, अनेक मार्गांनी  बळकट करतील असंही त्यांनी सांगितलं.


महत्त्वाच्या बातम्या:


Narendra Singh Tomar : आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 हे जन चळवळ म्हणून साजरे करणार, भारताला जागतिक स्तरावर उत्पादन वाढवण्याची संधी : कृषीमंत्री