kharif season : खरीप हंगाम 2022-23 च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलैपर्यंत सहभागी होण्याचं आवाहन कृषी विभागाच्यावतीनं करण्यात आलं आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. अधिसूचित पिकांसाठी खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीनं शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र असल्याचंही कृषी विभागानं सांगितलं आहे. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के आणि नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
या कारणांसाठी विमा संरक्षण
या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळं पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळं होणारं नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळं पिकांचं होणारं नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पुरक्षेत्र जलमय होणे, भुसखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गीक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणी पश्चात नुकसान अशा जोखमीच्या कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाणार आहे. ई-पीक पाहणी अंतर्गत पीकांची नोंद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदवण्यात आलेलं पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उदभवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदवण्यात आलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेचा शाखा, नजिकचे विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी खात्याचे कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- kharif sowing : अहमदनगर जिल्ह्यात 2 लाख 8 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण, अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा
- Marathwada: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात सरासरीएवढा पाऊस; पाच जिल्ह्यात मात्र प्रतीक्षा