Onion Farmer : सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmer) संकटात आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. मिळालेल्या उत्पन्नातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. एका शेतकऱ्याला 205 किलो कांद्यांच्या विक्रीतून हाती फक्त 8 रुपये आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कर्नाटक (karnataka) राज्यातील गदग (Gadag) जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे कांद्याच्या विक्रीसाठी या शेतकऱ्याने तब्बल 415 किमीचा प्रवास केला आहे.   


कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले होते. आपल्या कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी शेतकऱ्यानं 415 किमी दूर असणाऱ्या बंगळुरूच्या बाजारपेठेत विक्रीसाठी कांदा पोहोचवला. पण बंगळुरुच्या यशवंतपूर मंडईत 205 किलो कांद्याच्या विक्रीतून शेतकऱ्याला केवळ 8 रुपये 36 पैसे मिळाले. कांद्याला कमी दर मिळाल्यानं हताश झालेल्या शेतकऱ्याने कांदा विक्रीची पावती सोशल मीडियावर टाकली. ही पावती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


 




उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक


गदग जिल्ह्यातील पावडेप्पा हलिकेरी हे बंगळुरूमधील यशवंतपूर बाजार समितीत कांदा विकण्यासाठी गेले होते. तेव्हा येथील घाऊक विक्रेत्याने पावडेप्पा यांचा 200 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी केला. यानंतर घाऊक विक्रेत्याने शेतकऱ्याच्या नावे पावती तयार केली. यामध्ये मालवाहतूक शुल्क 377 रुपये आणि कांदा उचल शुल्क 24 रुपये होते. या सर्वांचा खर्च वजा केल्यावर शेवटी शेतकऱ्याच्या हातात फक्त 8 रुपये 36 पैसे आले. शेकडो किलोमीटरचा प्रवास करूनही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडली. यानंतर, शेतकऱ्याने सोशल मीडियावर कांदा विक्रीची पावती शेअर केली. तसेच इतर शेतकऱ्यांनाही यशवंतपूर बाजार समितीत कांदा न विकण्याचं आवाहन केलं.


कांद्याला आत्तापर्यंत 25 हजार रुपयांचा खर्च 


महाराष्ट्रातील अनेक शेतकरी देखील बंगळुरूच्या यशवंतपूर बाजारात त्यांचा कांदा विक्रीसाठी आणतात. काही वेळाला शेतकर्‍यांच्या कांद्याला चांगला दर मिळतो, तर काही विळेला अचानक कांद्याचे भाव इतके खाली येतात की शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याचे मत पावडेप्पा हलिकेरी यांनी व्यक्त केले. गदग आणि उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल सावध करण्यासाठी आपण पावती सोशल मीडियावर शेअर केल्याचेही ते म्हणाले. कांद्याला आततापर्यंत 25 हजार रुपयांचा खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली.


बदलत्या हवामानाचा पिकांना मोठा फटका


कर्नाटकातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळं उत्पादनात घट येत आहे. याचा शेतकऱ्याना फटका बसत आहे. गदग जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. याचा कांद्यालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यातच वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ajit Pawar : शरद पवार कृषीमंत्री असताना एका कॉलवर कांदा निर्यात खुली व्हायची, आता आपल्याला कोणी वाली नाही : अजित पवार