Agriculture News : गेल्या काही काळात भारताने कृषी क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. देशभरात अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध, अंडी आणि मासे या प्रमुख कृषी उत्पादनांमध्ये (agricultural products) अनेक पटींनी वाढ झाली असल्याचे मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे (Minister Shobha Karandlaje) यांनी व्यक्त केलं. लोकसंख्या वाढत असूनही दरडोई खाद्यपदार्थांची उपलब्धताही वाढली आहे. जगाला पुरवठा करु शकणाऱ्या कृषी उत्पादनांच्या प्रमुख निर्यातदारांपैकी, भारत एक देश बनला असल्याचे शोभा करंदलाजे म्हणाल्या.
आंबा फळांवर पडणाऱ्या किडींचे उच्चाटन करण्यासाठी असणाऱ्या उपाययोजनांवर आशिया-प्रशांत क्षेत्र रोप संरक्षण आयोगाच्या कार्यशाळेचे, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. APPPC आणि कृषी मंत्रालयाने ही कार्यशाळा संयुक्तपणे, नवी मुंबईतल्या वाशी इथे 19 ते 23 जून 2023 पर्यंत आयोजित केली आहे. या परिषदेत 25 देशांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच ऑनलाइन पध्दतीने सहभागी झाले आहेत. अशा प्रकारची कार्यशाळा केवळ त्या भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच आवश्यक नाही तर जागतिक योगदानामध्ये भारताच्या वाढत्या जबाबदारीचे एक प्रतीक असल्याचे करंदलाजे म्हणाल्या.
कृषी निर्यातीत वाढ झाल्याने, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होतो. शेतकऱ्यांना निर्यातीचा फायदा मिळावा यासाठी केंद्र सरकारने, शेतकरी उत्पादक संस्था/कंपन्या (FPOs/FPCs) आणि सहकारी संस्थांना निर्यातदारांशी थेट संवाद साधता येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरता, फार्मर्स कनेक्ट पोर्टल सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने निर्यात करण्यासाठीही महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
आंबा फळाला लागणारी कीड चिंतेची बाब
आपल्या देशाच्या विविध भागांमध्ये आंब्याच्या शेकडो लोकप्रिय जाती आहेत. आंब्याचे उत्पादन तसेच निर्यातीच्या दृष्टीकोनातून, आंबाफळाला लागणारी कीड तसेच विविध प्रकारचे विनाशकारक कीटक, इतर अनेक देशांसह भारतासाठीही चिंतेचा विषय बनले आहेत. असे असूनही, भारत अनेक देशांना कीड मुक्त आणि कीटकनाशक मुक्त आंब्यांची निर्यात करत आहे, ही समाधानाची बाब असल्याचे कृषी राज्यमंत्र्यांनी नमूद केले. राज्य सरकारे, निर्यातदार, शेतकरी आणि इतर भागधारकांसह, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, किडींचे निर्मूलन करण्यासाठी राबवता येऊ शकणाऱ्या उपाययोजना आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन यांच्या अंमलबजावणीद्वारे, हे सर्व शक्य होत असल्याचे त्या म्हणाल्या.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने, रोप संरक्षण, विलगीकरण आणि साठवणूक संचालनालयाची स्थापना केली आहे. या संचालनालयाने अनेक राष्ट्रीय मानके (NSPM) आणि मानक कार्यप्रणाली (SOP) विकसित केल्या आहेत. या अंतर्गत देशभरात फळांची खोक्यांमध्ये सुरक्षित बांधणी करण्यासाठी पॅक हाऊसेस, ही केंद्र आणि फळे सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रक्रिया सुविधा विकसित केल्या आहेत. या सुविधांमध्ये, गरम पाण्याची प्रक्रिया, बाष्पाद्वारे उष्णता प्रक्रिया आणि विकिरणाद्वारे (irradiation) जंतूनाश यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या आणि संबंधित इतर बाबींवर तपशीलवार चर्चा केली जाईल. आयोगाचे सदस्य असलेल्या देशांच्या अनुभवांची देवाणघेवाण होईल, आयोगाचे सदस्य देश आणि उर्वरित जगामध्ये, या उपाययोजनांमध्ये आणखी सुधारणा करत त्यांची परस्पर सामंजस्याने अंमलबजावणी केली जाईल असे त्या म्हणाल्या.