Narendra Singh Tomar : विकासाचा विचार करताना आपला सर्वांगीण दृष्टिकोन असायला हवा असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं. विकासाचा अर्थ केवळ रस्ते किंवा घरे बांधणे असा होत नाही, तर समाजातील सर्वात दुर्बल घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला पाहिजे, तरच खरा विकास होईल, असेही तोमर म्हणाले. भारताकडे शेतकऱ्यांच्या रुपाने प्रचंड कुशल मनुष्यबळ आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे तोमर म्हणाले.


इंडिया सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात नरेंद्र सिंह तोमर बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी हे देखील उपस्थित होते.  आपल्या देशाची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळं सर्व लोकांना संधी उपलब्ध करुन दिल्या आणि त्यांनी एकत्रितपणे  योगदान दिले तरच विकसित भारत शक्य होईल. समाजातील सर्वात दुर्बल घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला पाहिजे, तरच खरा विकास होईल, असेही तोमर यावेळी म्हणाले. 


सरकारकडून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न


दरम्यान, भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं तोमर यांनी सांगितलं. आज कृषी क्षेत्रात ड्रोन, डिजिटल अॅग्री मिशन आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन त्याचे उन्नतीकरण केले जात आहे. कृषी स्टार्टअप्सला प्रोत्साहन, किसान क्रेडिट कार्डचे  वितरण आणि 16 लाख कोटी रुपये अल्पावधी कर्ज यासारखी अनेक ठोस पावले सरकारकडून उचलण्यात आली आहेत.  कोविड-19 महामारीच्या काळातही, शेतकर्‍यांनी अन्नसुरक्षा सुनिश्चित केली. त्याचबरोबर केंद्राने 80 कोटी गरीब लोकांना मोफत अन्नधान्य दिल्याचा उल्लेख तोमर यांनी यावेळी केला. 


शेतीत तंत्रज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं


जर आपण कृषी क्षेत्रापासून दूर गेलो तर आपल्याकडे पैसा असला तरी कृषी उत्पादने उपलब्ध होणार नाहीत. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान निम्मे होते. आता मात्र, हळूहळू हे प्रमाण कमी होत गेल्याचे तोमर यांनी यावेळी सांगितलं. देशात 66 टक्के अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्यासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, जागतिक मानकांनुसार उत्पादनाचा दर्जा वाढवणं, तसेच शेती क्षेत्रात अधिक विकास घडवून आणणं आवश्यक असल्याचे तोमर यांनी सांगितले. 


महत्वाच्या बातम्या: