धुळे : मानवांमध्ये ज्याप्रमाणे कोरोना व्हायरस हा विषाणू जीवघेणा ठरत आहे, त्याचप्रमाणे जनावरांमध्ये देखील लाळ खुरकूत हा आजार जीवघेणा ठरत असल्याचे मत जिल्हा पशुसंवर्धन तथा जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे कोरोनाला अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे माणसांचे लसीकरण आवश्यक केले आहे, त्याचप्रमाणे जनावरांमधील लाळ खुरकूत या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनातर्फे जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे.
लाळ खुरकूत या आजारामुळे जनावरांची चारा खाण्याची इच्छा मरते. त्यानंतर जनावराच्या पचन क्षमतेसह शरीरावर त्याचा परिणाम दिसू लागतो. या आजारामुळे जनावरांची दूध देण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम होत असल्याचे पशुवैद्यकीय विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. हळूहळू लाळ खुरकूत या आजाराने ग्रस्त झालेले जनावर काही काळानंतर दगावण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे या जीवघेण्या व संसर्गजन्य आजारांपासून जनावरांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र शासनातर्फे जिल्हा पशु वैद्यकीय विभागामार्फत लसीकरण मोहीम संपूर्ण देशभरामध्ये राबविण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून या आजाराच्या निर्मूलनासाठी शंभर टक्के निधीतून 2 लाख 80 हजार मात्रा या धुळे जिल्हा पशुवैद्यकीय विभागास उपलब्ध झाल्या होत्या. त्यानुसार धुळे जिल्हा पशुवैद्यकीय तसेच धुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे तात्काळ लसीकरण मोहीम राबवत जनावरांना लाळ खुरकूत या आजारापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यात आले आहे.
सहा महिन्यातून एक डोस या प्रमाणे वर्षभरातून दोन लसीचा डोस जनावरांना जिल्हा पशुवैद्यकीय विभागातर्फे देण्यात येत आहे. तरी ज्या पशुपालकांनी अद्यापही आपल्या जनावरांना लाळ खुरकूत या आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण केले नाही, अशा पशुपालकांनी तात्काळ आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन व जिल्हा पशुवैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.
त्यामुळे ज्या प्रकारे मानवांमध्ये आढळणारा कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी आपण लसीकरणाचे डोस घेत आहोत, त्याचप्रमाणे जनावरांमध्ये देखील लाळ खुरकूत या जीवघेण्या आजारावर मात करण्यासाठी जनावरांचे देखील लसीकरण करून आजार हद्दपार करण्यास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.