turmeric Export: बांगलादेशातील अराजकतेमुळं महाराष्ट्रातील हळीदीच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाल्याचं समोर येतंय. हिंगोली जिल्ह्यातून दररोज साधारण १५० टन हळदीची बांगलादेशात निर्यात होत असते.मात्र आता बांगलादेशात ओढावलेल्या अराजकतेमुळे हळद निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे. हिंगोलीतील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून हळदीचे पूर्ण पेमेंट थांबल्याचे सांगण्यात आले आहे. आता बांगलादेशात हळद निर्यात करायची की नाही याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून निर्यात कंपन्याही बांग्लादेशात हळद पाठवण्यात धजावत नसल्याचे समोर येतंय.
जागतिक बाजारपेठेत हिंगोलीच्या हळदीची निर्यात अधिक
जागतिक बाजारपेठेत ८० टक्के हळद ही भारतातून पाठवली जाते. यात महाराष्ट्रातून बांग्लादेशासह इतर आखाती राष्ट्रांमध्ये हिंगोलीतून हळद निर्यातीचे प्रमाण मोठे आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हळदीचा भाव मोठ्या प्रमाणात घसरला असून हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हळद पडून आहे. काल हळदीचे भाव साधारणता १००० ते १२०० रुपयांनी घसरलेले आहेत. पुढील महिनाभर भाव घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी साधारणता एक महिन्याचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे.
हिंगोली हळद लागवडीचे एकूण क्षेत्र किती?
हिंगोली परिसरात वायगाव प्रतिभा सेलम या जातीच्या हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. राज्यात मागील वर्षी हळद लागवडीचे एकूण क्षेत्र सुमारे ८४ हजार ६६ हेक्टर आहे. त्यापैकी एकट्या हिंगोलीत ४९ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत निम्म्याहून अधिक आहे. हळदीचे विक्रमी उत्पादन घेणारा जिल्हा म्हणुन ओळख आहे. येथील हळदीला देशभरातून मागणी असते. जिल्ह्यातील एकूण हळद उत्पादनापैकी २५ ते ३० टक्के हळद बांगलादेशात निर्यात होते. त्या ठिकाणाहून इतर देशांत हळद पोहोचते.
बांगलादेशातील अराजकेमुळे हळद निर्यातीवर परिणाम
हळदीसह कापूस गाठी, सेंद्रिय रसायने, सोयापेंडसह इतरही काही छोटी-मोठी उत्पादनांची बांगलादेशात प्रामुख्याने निर्यात होत असते. त्यामुळे आता जिल्ह्यातून कृषी, सेंद्रिय रसायन उत्पादने हळद निर्यातीसाठी वेगळे धोरण किमान जिल्हास्तरावर आखणे गरजेचे आहे. जिल्ह्याचे अर्थकारण कृषीवर अवलंबून असून औद्योगिकदृष्ट्या विचार होणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा:
हिंगाेलीतील कृषी उत्पन्न बाजारसमितीतील मोंढा राहणार 9 दिवस बंद, हळदीची आवक वाढली