Hingoli News : संपूर्ण भारताच्या इतिहासात पहिल्यांदा वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला सर्वोच्च म्हणजेच तीस हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे. भविष्यात हे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. याची काय आहेत कारणे यासंदर्भात पाहूयात...


महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्यांमध्ये हळदीचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाराही महिने हळदीची विक्री होत असते. काल (शुक्रवारी) याच बाजार समितीमध्ये परभणीच्या दिग्रस येथील शेतकरी शेषराव बोंबले यांनी त्यांच्याकडे असलेले हळदीचे अकरा पोते विक्रीसाठी आणले होते.  त्यांच्या हळदीला तब्बल तीस हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. भारताच्या इतिहासातील हा सर्वोच्च भाव मानला जातोय, त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


हळदीचे एवढे भाव वाढण्याचे कारण काय? एवढ्या जास्त दराने हळद का खरेदी केली ? आम्ही हेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये याबाबत आनंदाचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांसह सर्वच शेतकऱ्यांने याचे स्वागत केलेय. हळदीचे इतक्या मोठ्या प्रमाणात भाव वाढण्याचे अनेक कारण समोर आले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून   


१) मागील पाच ते सात वर्षांपासून हळदीला चार ते पाच हजार रुपये इतकाच भाव मिळत होता त्यामुळे गेल्या वर्षी हळद लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती 


२) गेल्या वर्षी हळद काढणीनंतर हळद वाळवली जात होती त्या काळात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीची गुणवत्ता घसरली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर हळद विक्री केली होती 


३) परिणामी बाजारात मोठ्या प्रमाणात हळदीची टंचाई निर्माण झाल्याने भाव वाढले आहेत 


४) मागील पाच ते सात वर्षांपासून हळदीला चार ते पाच हजार रुपये भाव मिळतो त्यामुळे कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी हळद लागवडी कडे पाठ फिरवली आहे राज्यांमध्ये 30 टक्के पर्यंत हळद लागवडीचे क्षेत्र घटले आहे 


५) या वर्षी पावसाने एक महिन्याहून अधिक काळ दडी मारल्याने हळद लागवडीला जवळपास एक महिना कालावधीचा उशीर झाला आहे त्यामुळे पुढील वर्षी लागवडी प्रमाणे हळदीचे उत्पादन सुद्धा घटू शकते त्यामुळे पुढील वर्षीची टंचाई लक्षात घेता आतापासूनच हळदीचे भाव वाढू लागले आहेत 


हळदी पासून विविध औषधी रंग त्याचबरोबर मसाले सुद्धा मोठ्या प्रमाणात हळदीचा वापर होत असतो. त्यामुळे हळदीची दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचबरोबर यावर्षी हळदीची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे हळदीचे भाव कायम राहू शकतात. किंबहुना पुढील वर्षी यापेक्षाही वाढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.