Latur Rain News : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. दोन दिवसांच्या उघडीपीनंतर लातूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील औसा (Ausa) आणि निलंगा (Nilanga) तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. दरम्यान, या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत, तर शेतकऱ्यांच्या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.


लातूर जिल्ह्यात आषाढी एकादशीपासूनच पावसानं चांगलाच जोर धरला आहे. मागील दोन दिवसाच्या उघडीपनंतर पुन्हा जिल्हाभरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. औसा आणि निलंगा तालुक्यातील काही ठिकाणी कमी वेळात तुफान पावसाची नोंद झाली आहे. औसा तालुक्यातील अपचुंदा, तपसेचिंचोली, लामजना, मंगरुळ शिवारात कमी कालावधीत तुफान पाऊस झाला आहे. तर निलंगा तालुक्यातील शेडोळ शिवारात अतिवृष्टी झाली आहे.




दरम्यान, या मुसळधार पावसामुळं शेडोळ आणि लामजना शिवारात सर्वाधिक नुकसान झालं आहे. या भागातील ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. या भागातील अंतर्गत रस्त्यावर असणारे छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. चार दिवसापूर्वी या भागात असाच पाऊस झाला होता. पुलावरुन पाणी वाहत असताना एक दुचाकीस्वार वाहून गेला होता. अपचुंदा, तपसेचिंचोली, लामजना, मंगरुळ, शेडोळ आणि लामजना या भागातील शिवारात असणारं सोयाबीन पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. येथील अनेक शिवारात पाणीच पाणी झाले आहे. पाण्यात बुडल्यामुळं सोयाबीनचे पीकही हाताचे गेले आहे. काही भागात जमीन खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं पीकही गेले आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. 




लामजना शिवारातील सैलानी रोजेवाले यांच्या मालकीची साडेपाच एकर शेतजमीन आहे. त्यांना 45 हजार रुपये सोयाबीन लागवडीचा खर्च आला आहे. काल झालेल्या पावसानं त्यांची जमीन खरवडून गेली आहे. त्यांच्या दोन चुलत्यांच्या शेताची देखील अशीच अवस्था झाली आहे. त्यांच्याही प्रत्येकी साडेपाच एकर शेत जमिनीची अवस्था अशीच झाली आहे. जमीन खरवडून गेल्यामुळं दुबार पेरणी करण्यासाठी जमीनच राहिली नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: