Europe droughts : सध्या युरोपमध्ये उष्णतेची लाट (Europe heat wave) आली आहे. अनेक ठिकाणी वणवे पेटत असून, दुष्काळाची (droughts) स्थिती निर्माण झाली आहे. हवामान बदलाचा मोठा फटका युरोपमधील देशांना बसला आहे. अशा परिस्थितीमुळं युरोपमधील अन्न सुरक्षेवर मोठा परिणाम होणार आहे. कारण तेथील शेतीवर देखील या उष्णतेचा मोठा परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळं शेती क्षेत्रावर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत भारताला युरोपमध्ये अन्नधान्य निर्यात करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
अन्न पुरवठादार देश म्हणून भारताला स्थान मिळवण्याची संधी
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युरोपमधील आर्थिक संकट ही गंभीर चिंतेची बाब आहे. उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा परिणाम तेथील अन्न सुरक्षेवर होत आहे. अशा स्थितीत भारतातील खाद्यपदार्थांची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. भारतात देशांतर्गत वाढत्या किमतींमुळे धान्य आणि इतर कृषी-उत्पादनांवर अचानक निर्यात बंदी लावण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही युरोपातील सद्याची स्थिती पाहता भारताला अन्नधान्य निर्यातीची मोठी संधी आहे. जगातील अन्न पुरवठादार देश म्हणून भारताला स्थान मिळवण्याची एक संधी आहे. त्यामुं अशा स्थितीत भारतानं अन्न निर्यातचे धोरण काळजीपूर्वक तयार केले पाहिजे, असे एका संशोधन संस्थेच्या विश्लेषकाने सांगितले आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या कालावधीत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
भारतातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत 20 टक्क्यांची वाढ
चालू आर्थिक वर्षासाठी, भारत सरकारनं कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीचं 23.56 अब्ज डॉलर लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, या वर्षात भारताची सीफूड निर्यातही मागली वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, 2020-21 मध्ये भारतातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत जवळपास 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. निर्यात 19.92 अब्ज डॉलरवरुन 50.21 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ही निर्यातीमधील मोठी वाढ मानली जात आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा अन्नधान्याच्या किंमतीवर परिणाम
रशिया-युक्रेन युद्ध आणि हवामानातील बदलांमुळे जागतिक अन्नधान्याच्या किंमतीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. अन्नधान्यांच्या किंमतीत सध्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे. युनायटेड नेशन्सने आधीच याबाबत इशारा दिला आहे की, 94 देशांमधील अंदाजे 1.6 अब्ज लोक आता युद्धानंतर अन्न, ऊर्जा किंवा आर्थिक संकटांना सामोरे जाणार आहेत. खाद्यपदार्थांबरोबरच भारतातून युरोपमध्ये कमी किंमतीच्या वस्तूंची निर्यातही वाढण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत, साबण आणि शॅम्पूसारख्या कमी किंमतीच्या वस्तूंची चीनमधून युरोपमध् निर्यात होत होती. मात्र, या वस्तू निर्यात करण्याची आता भारताला संधी मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Trade Deficit: जुलै महिन्यात व्यापारातील तूट 31 अब्ज डॉलरवर; निर्यात 12 टक्क्यांनी घसरली
- Amit Shah : कृषी निर्यातीत भारतानं प्रथमच 50 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला : केंद्रीय मंत्री अमित शाह