हिंगोली : भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु शेती परवडत नाही असे बहुतांश शेतकरी म्हणतात. परंतु इच्छाशक्ती असेल तर शेती नक्की परवडते आणि लाखोंचं उत्पादन सुद्धा घेता येतं, ही किमया करुन दाखवली आहे हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा इथले शेतकरी पंकज आडकिने यांनी. जरबेराच्या दहा गुंठे फूल शेतीमधून ते वर्षाकाठी सात लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत. 
 
पंकज अडकिने हे पुणे इथे प्रशिक्षणासाठी गेले असता तिथे फूल शेती त्यांच्या निदर्शनास आली आणि तेव्हाच त्यांनी आपल्या शेतात फुलांचं उत्पादन घेण्याचं ठरवलं. फुलांचं उत्पादन कसं घ्यायचं, पाणी आणि फवारणीचा समतोल कसा राखायचा, यातून आर्थिक उत्पन्न किती होतं, काय मेहनत घ्यावी लागणार याचं संपूर्ण प्रशिक्षण त्यांनी पुणे इथे घेतलं.


अडकिने यांनी बँकेकडून 14 लाख रुपये कर्ज घेऊन दहा गुंठे जमिनीवर पॉलिहाऊस तयार केले. या पॉलिहाऊसमध्ये तीन तीन फुटाचे असे बेड तयार करण्यात आले. या बेडमध्ये लाल मातीचा वापर करण्यात आला आहे. या मातीवर अडकिने यांनी जरबेरा या फुलांच्या रोपट्यांची लागवड केली.


या रोपांची लागवड करताना त्यांना दोन लाख रुपये इतका खर्च आला. त्यानंतर आजपर्यंत या फूल शेतीमधून दररोज फुलांचे उत्पादन घेतले जात आहे. या जरबेराच्या प्रत्येकी एका फुलाला दहा रुपये ते वीस रुपयांपर्यंत बाजार भाव मिळतो. अडकिने दररोज ही फुलं नांदेड आणि हिंगोलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात. त्यामधून त्यांना दररोज तीन ते चार हजार रुपये मिळतात.


या फूल शेतीचे उत्पादन घेत असताना खूप कमी प्रमाणात पाणी, अत्यल्प मेहनत आणि अचूक वेळी फवारणी करावी लागते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये तापमान वाढले तर तापमान स्थिर ठेवण्यासाठी कूलर त्याचबरोबर पाण्याचा फवाराच्या माध्यमातून पॉलिहाऊसमधील तापमान स्थिर ठेवावं लागतं. एवढी काळजी घेतल्यास पॉलिहाऊसमधील या जरबेराचं पीक तुम्हाला लखपती करणार हे मात्र निश्चित.


वर्षाकाठी पंकज अडकिने हे या फुलशेतीतून खर्च वजा करता पाच लाख रुपये निव्वळ नफा कमवत आहेत.