Wardha News :  कृषी क्षेत्रातील आधुनिक फवारणीच्या तंत्रज्ञानाला वर्ध्यात एका महिला पायलटच्या प्रयत्नांची जोड मिळणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात कीटकनाशक फवारणीतून वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहे. वर्ध्यात खाजगी कंपनीकडून दोन ड्रोन पायलटची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये लिनता वाघमारे या महिला पायलट यांचा समावेश आहे. धाडसाने या क्षेत्रांत येत राज्यातून पहिल्या महिला ड्रोन पायलट होण्याचा मान लिनता यांनी मिळविला आहे. शेताच्या बांधावर आकाशात झेपावणाऱ्या ड्रोनच्या रिमोटचे बटण महिलेच्या हातात असणार आहे. 


बोरगाव मेघे येथील सासर आणि वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील झडशी येथील माहेर असलेल्या लीनता वाघमारे यांचे शिक्षण बीएससी कृषी आणि एमएससी बॉटनीपर्यंत झाले आहे. साडेतीन वर्षांचा मुलगा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना लीनता यांना काहीतरी करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच पुण्याच्या एका खाजगी कंपनीची जाहिरात हाती लागली. त्यांनी मुलाखत देत ड्रोन पायलट म्हणून जबाबदारी स्वीकारली. शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी करताना ड्रोन फवारणीचे फायदे त्या आधी शेतकऱ्यांना पटवून सांगतात. ड्रोन फवारणीचा फायदा देखील शेतकऱ्यांना होत आहे.


ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करताना घ्यावयाची काळजी घेतली जात आहे. झडशीच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील लीनता यांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. झडशी येथे वडील प्रभाकर शेळके शेती करतात तर पती प्रीतम वाघमारे हे पतसंस्थेत नोकरीला आहे. शेतकरी कुटुंबातील मुलगी आज शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार आहे. 


आपले प्रशिक्षण संपवून कामाला लागलेल्या लीनता शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीचे फायदे पटवून देत आहे. महिला आता कृषी क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवत आकाशात उडणाऱ्या ड्रोनला जमिनीवरून नियंत्रित करण्याची जबाबदारी पेलवत आहे. 


भंडाऱ्यात मटनापेक्षाही मशरूम महाग; बाजारपेठेत 'जंगली मशरूम' घेण्यासाठी नागरिकांची झुंबड


पावसाळा (Monsoon Updates) सुरू झाला की, बाजारात रानभाज्या येतात आणि त्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडल्याचं पाहायला मिळतं. अशात श्रावण सुरू झाला की, लोक मासांहार खाणं टाळतात. त्यात पावसाळ्यात याच वेळेस जंगली मशरूम (Mushroom) विक्रीसाठी येतात. या मशरूमला ग्रामीण भागात 'सात्या' म्हणतात. हे लोकांच्या पंसतीस पडतात. आता भंडाऱ्यातील भाजी बाजारात मशरूम विक्रीसाठी आले आहेत. यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 


सध्या भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या बाजारपेठेसह भंडारा शहरातही मोठ्या प्रमाणात जंगली मशरूम  विक्रीसाठी आले आहेत. या जंगली मशरूमला मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रति एक पाव 300 रुपये दर असून एक किलो मशरूमसाठी 1000 ते 1200 रुपयांचा दर मिळत आहे. मटनापेक्षाही महाग असलेल्या जंगली मशरूमला सर्वसामान्यांमध्ये मोठी मागणी आहे. भंडाऱ्यातील बाजारात मोठ्या प्रमाणावर मशरुमची विक्री होत आहे. दर मोठा असला तरी, त्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबळ उडतेय. त्यामुळं या मशरूमच्या विक्रीतून लोक चांगल्या प्रकारची कमाई करत आहेत.