Dhule Sugar Factory : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या बारा वर्षापासून बंद आहे. थकित कर्जाच्या रकमेमुळं हा साखर कारखाना बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. हा कारखाना बंद असवल्यामुळं येथील ऊस उत्पादक शेतकरी मात्र मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. नेमकी तिथळ्या शेतकऱ्यांची स्थिती काय आहे ते पाहुयात..
गेल्या बारा वर्षांपासून शिरपूर येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना थकित कर्जाच्या रकमेमुळे बंद आहे. त्यामुळं येथील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाच हजाराहून अधिक एकरावर शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन घेतले असून, स्थानिक साखर कारखाना बंद असल्यानं बाहेरील कारखान्यांकडून ऊस तोडणीसाठी सध्या मोठ्या प्रमाणावर मनमानी सुरु आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी साखर कारखाना आजही बंद असल्याची प्रतिक्रिया सभासद असलेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे.
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या बारा वर्षांपासून बंद असला तरीदेखील आज नाहीतर उद्या हा साखर कारखाना सुरु होईल, या आशेवर शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन घेतात. अत्यंत कमी खर्चाचे ऊस पीक असल्यानं शेतकऱ्यांचा कल याकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, साखर कारखाना बंद असला तरी ऊस लागवडीत घट होण्याऐवजी वाढच होताना दिसून येत आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून उसाच्या शेतांना आग लागून पीक मोठ्या प्रमाणात जळून खाक होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील हा एकमेव साखर कारखाना असल्यानं, हा कारखाना सुरु झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे असल्याचे मत शिवाजीराव बोरसे पाटील यांनी व्यक्त केले.
बारा वर्षांपासून हा साखर कारखाना बंद असल्याने या भागातील तरुण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळं अनेक तरुण शेतकरी खासगी संस्था किंवा खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असून, त्यांनादेखील विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया तरुण शेतकरी कल्पेश सिंग राजपूत यांनी दिली आहे. शिरपूर सहकारी साखर कारखाना भविष्यात पुन्हा एकदा सुरु झाल्यास येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येतील यात शंका नाही. येथील ऊस उत्पादक शेतकर्यांचा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा एवढीच अपेक्षा सभासद शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: