Union Budget 2022 India: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांकडून केंद्र सरकारचे सरर्थन होत आहे. तर काही जणांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे प्रमुख अनिल घनवट यांनी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीच मिळाले नसल्याचे घनवट यांनी म्हटले आहे. देशातील शेतीला अधोगतीकडे घेऊन जाणारे निर्णय या अर्थसंकल्पात घेतले असल्याचे घनवट म्हणाले.


नेमकं काय म्हणाले घनवट?


पंजाबच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे या अर्थसंकल्पावर हमीभावाच्या मुद्यावर भर दिला आहे. ही खरेदी आत्तापर्यंत चालूच होती. पंजाबला गहू आणि तांदूळ सोडून इतर पिकाकडे वळवण्याची गरज असल्याचे घनवट म्हणाले. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी देशात सेंद्रीय शेतीच केली जात होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई होती. अमेरिकेकडून धान्य आयात करावे लागत होते. पुन्हा तिकडेच देशाला घेऊन जायचे आहे का? असा सवाल घनवट यांनी केला आहे. श्रीलंकेने रासायनिक खतांवर बंदी घातली, त्यामुळे त्यांचे 60 टक्के उत्पादन घटले. त्यामुळे त्यांना परदेशातून अन्न आयात करावे लागले, खते खरेदी करावी लागली. त्या दिशेनेच आपला देश जातो की काय अशी शंका वाटत असल्याचे घनवट म्हणाले. जग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विकास करत असताना आपण सेंद्रीय शेतीकडे जात असल्याचे अर्थमंत्री म्हणाले.


तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. कसे देणार ते सांगा? तेलबियांचे साठा मर्यादा लावून प्रोत्साहन देणार का? शेतकऱ्यांच्या तेलबियांना चांगले दर कसे मिळतील यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा त्यांनी करायला हवी होती असे घनवट म्हणाले. नदीजोड प्रकल्पांची घोषणा करतात. प्रत्यक्षात काहीच होत नसल्याचे घनवट म्हणाले. एकीकडे ड्रोन वापरण्याची परवानगी देता दुसरीकडे किटकनाशकमुक्त शेती करण्याचे सांगता, नेमकं करायचे काय असा सवाल त्यांनी केला. खतांच्या किंमती वाढत आहेत, त्या नियंत्रीत करता येतील का यासाठी काहीही बोलले गेले नाही. प्रक्रिया उद्योगाबाबत काहीही केले नाही. देशातील 40 टक्के नाशीवंत माल फेकून द्यावा लागतो. 


अर्थसंकल्पात  मूळ गोष्टींवर भर देण्याऐवजी हवेतल्या घोषणा -  संदीप जगताप


आज सादर झालेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना निराश करणारा आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरघोस तरतूद करण्याऐवजी भाषणबाजीवर भर दिलेला दिसून येतो. खत औषधांच्या किंमती गगनाला भिडल्यात त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कुठलीही तरतूद नसल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी जोरदार टीका केली. ऑरगॅनिक फार्मिंग ही वास्तव संकल्पना नाही. आज खता औषधांशिवाय शेती अशक्य आहे. म्हणून मूळ गोष्टींवर भर देण्याऐवजी हवेतल्या घोषणा झाल्या. मूलभूत सुविधा सुधरवणे. निर्यात वाढीला प्रोत्साहन देणे, प्रक्रिया उद्योग व शेतीपूरक औजारांना 100  टक्के अनुदान यासाठी भरघोस तरतूद नाही. यामुळे हा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा नसल्याचे सीतारमण यांनी म्हटले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: