Budget 2022 Digital Rupee : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा केली आहे. येत्या आर्थिक वर्षापासून 2022-23 पासून डिजिटल रुपया चलनात येणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल करन्सी लागू होणार आहे. मागील काही महिन्यांपासून डिजिटल चलनाबाबत चर्चा सुरू होती. आता डिजिटल चलनाबाबत अर्थसंकल्पीय भाषणात शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या दरम्यान त्यांनी डिजिटल करन्सीची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेद्वारे डिजिटल चलन सुरू केल्याने अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. RBI कडून 2022-23 मध्ये ब्लॉकचेन आधारीत डिजिटल रुपया जारी केला जाणार आहे. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर 30 टक्के कर लावण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. 


 






दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावरील आव्हानांचा सामना करत आहे मात्र या परिस्थितीत देखील भारतानं कोरोनो महासाथीच्या आव्हानांचा चांगला सामना केला आहे.  अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी सांगितलं की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील 25 वर्षाची ब्ल्यू प्रिंट असेल. देशात आर्थिक रिकव्हरीला बळकट करण्यावर फोकस केला जाणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.  


या अर्थसंकल्पातून भारताला पुढील 25 वर्षांचा पाया रचण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरतेय.  आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं त्या म्हणाल्या. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलं.