Agriculture Success Story: शेती हेच उपजीविकेचं साधन असलेल्या घरात शेतकऱ्याचा मृत्यू होणं याची कल्पना करणंही केवढं कठीण. पण शेतकरी गेला तरी त्याच्या बायकोवर संसाराचा सगळा भार उचलण्याची धमक असते हेही आपल्याला नवं नाही. पुण्यातील जुन्नरच्या वंदना गुंजाळ पतीच्या निधनानंतर 15 एकर शेती एकहाती सांभाळत अर्ध्या एकरात केलेल्या झुकीनीच्या प्रयोगातून लाखो रुपये कमवत आहेत. त्यांच्या या प्रयोगाचं गावात आणि परिसरात कौतूक होतंय.
पती गेल्यानंतर शेतीचा सगळा भार वंदनाताईंवर पडला. दहा एकर शेती एकहाती सांभाळत नवनवे प्रयोग करण्याचं बळ कसं आलं असेल त्यांच्यात? शिक्षण कलाशाखेतलं. पण पती गेल्यानंतर वैयक्तिक आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागलं. मात्र, चिकाटीने 15 एकर शेती सांभाळली. शेतीची आवड असलेल्या वंदनाताईनी पिकांवर वेगवेगळे प्रयोग करत अद्ययावत तंत्रज्ञान वापरून त्यांच्या शेतातील अर्ध्या एकरात अमेरिकन झुकीनीची लागवड केली.40 दिवसांच्या या पिकातून हंगामी 90,000 ते एक लाख रुपयांचं उत्पन्न कमवत त्यांना चांगलंच यश मिळालंय.
पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेली वंदनाताईंची झुकीनी
महाराष्ट्रातला शेतकरी आता नवनव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची गरज ओळखून पिकांची लागवड करायला लागलाय. पिकाचे योग्य नियोजन आणि खर्चाचा ताळमेळ जपत काही गुंठ्यापासून सुरुवात करत शेतकरी चांगलं उत्पन्न काढू लागलेत. सिजनल पिकांसह अर्ध्या एकरातली लागवड चांगला फायदा करून देणारी ठरतेय. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या जुन्नरच्या एका शेतकऱ्यानं अशीच हिंमत करत पारंपरिक शेतीसोबतच अमेरिकन झुकीनी पिकाची लागवड करत लाखोंची कमाई केली आहे. विशेष म्हणजे केवळ अर्ध्या एकरात पिकवलेल्या वंदना गुंजाळ यांची पौष्टीक झुकीनी आता पंचतारांकीत हॉटेल्समध्ये जाऊन पोहोचली आहे. सध्या झुकीनीच्या एका तुकड्याचा बाजारभाव 15 रुपये आहे. पालेभाज्यांची लागवड करताना वंदनाताईंनी या पिकाचा पूर्ण अभ्यास करून कुटुंबाच्या साथीनं 40 दिवसांच्या झुकीनी पिकातून हंगामी 90 ते एक लाख रुपयांचा नफा मिळवलाय.
कशी केली लागवड?
गडद हिरव्या रंगाचं काकडीसारखी दिसणारी ही 'झुकीनी' 200 ग्रॅम वजनाची आहे. आरोग्याच्या फायद्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या झुकीनीची पंचतारांकीत हॉटेल्सची मोठी मागणी आहे. हे ओळखून वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनीचा प्रयोग केला. झुकीनीची लागवड करताना त्यांनी बेडमध्ये पाच फूट अंतर ठेवलं. खत टाकण्यात आलं आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मल्चिंग पेपर टाकून 1500 बीड तीन फूट अंतरानं त्यांनी पेरल्या. सेंद्रीय कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. 30 ऑगस्टपासून त्यांनी झुकीनीच्या लागवडीस सुरुवात झाली.
किती खर्च? कमाई किती झाली?
एका कृषी प्रदर्शात उपस्थित राहून अद्ययावत तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेतली. पहिल्यांदा पुण्यातील एका कार्यक्रमात झुकीनीबद्दल माहिती त्यांना मिळाली. लागवडीचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर कुटुंबाच्या मदतीनं वंदनाताईंनी झुकीनीसाठी प्रयत्न केले.यासाठी त्यांना 25,000 ते 30,000 खर्च आला. हा खर्च वजा केल्यानंतर 90 हजार ते एक लाख रुपयांचा अंदाजित नफा त्यांनी कमवलाय.शहरी भागात भाजीपाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे आणि गुंजाळ यांना येत्या हंगामात सुमारे तीन टन उत्पादन घेण्याची अपेक्षा आहे.