Farmer success story: आजकाल शेतीकडे फारसा तरुणांचा कल नसतो. सगळे जण नोकरीच्या शोधात पुणं-मुंबई गाठतात. नोकरी करणाऱ्याला कशी शेती करता येईल असे सगळे समज सांगलीच्या रामराव पाटील या तरुणाला लागू होत नाहीत. पेश्याने अभियंता असणाऱ्या सांगलीच्या या तरुणानं एकीकडे इंजिनिअर म्हणून खासगी कंपनीत नोकरी स्विकारली आणि दुसरीकडे अवघ्या ६० गुंठ्यात रताळ्याचं उत्पादन घेतलं. या रताळ्याच्या पिकातून या तरुणाला तब्बल ६.५ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. 


प्रयोगशीलता हा गुण अंगी असल्यानं आवडीतून या तरुणानं आर्थिक प्रगती साधली आहे.  शेतात वेगवेगळे प्रयोग करत रताळे लाऊन पाहीले. साठ गुंठे क्षेत्रातून या तरुणानं ९ टन रताळ्याचं उत्पादन काढलं आहे.


सांगलीच्या तरुणानं ६० गुंठ्यातून काढलं ९ टन उत्पादन


शेतीत सर्वात महत्वाचं काय? जमीन, माती, पाणी आणि  नंतर पीक. पण त्याहीपेक्षा आव्हानात्मक पीकाचा फेरपालट करणं. तेचतेच पीक घेतल्यानं मातीचा पोत बिघडतो त्यामुळे अनेक शेतकरी पीक फेरपालट करण्यासाठी भुईमुग, सोयाबीन रताळं अशा पिकांचा वापर करतात. मातीच्या आरोग्याचं महत्व ओळखून रामराव पाटील यांनी ६० गुंठ्यात रताळं लावण्याचा प्रयोग करून पाहिला. उत्तम काळजी घेतली. ऑगस्ट महिन्यात रताळ्याची काढणी करण्यात आली व त्यांना जवळपास नऊ ते दहा टन उत्पादन मिळाले. या रताळा लागवडीतून त्यांना साडेसहा लाख रुपयांचा फायदा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.


नोकरीसोबत केली शेती, रताळ्यातून लखपती


सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगावचे रामराव पाटील या तरुणानं इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर ते एका खासगी कंपनीत नोकरी करतात. या तरुणानं नोकरी करत असताना शेतीची आवड जपण्याचा त्यांना प्रयत्न केला.  योग्य व्यवस्थापन केल्यानं नोकरी आणि शेतीची सांगड घालत त्यांनी रताळ्यातून लाखो रुपये कमावले आहेत.


मुंबईच्या बाजारात रताळे विकले


राज्यात कोणत्याही उपवासाला रताळ्याचे काप, रताळ्याचा कीस आणि रताळ्याचे कितीतरी वेगवेगळे पदार्थ होतातच. पण सांगलीच्या शेतकऱ्यानं रताळ्याची केवळ ६० गुंठ्यात लागवड करत ९ ते १० टन रताळ्याचं पीक काढलं. या रताळ्यांची मुंबईच्या बाजारात विक्री करत टनामागे साधारण ७० हजार रुपयांचा भाव मिळवला. 


रताळं हे तीन महिन्याचं पीक


रताळं हे मुळातच तीन ते साडेतीन महिन्यांचं पीक आहे. लागवडीनंतर आवश्यकतेनुसार, कीटकनाशकाची फवारणी करून पिकाला नीट पाणी पुरवत रामराव पाटील या तरुणानं ऑगस्ट महिन्यात कापणी केली. तेंव्हा साधारण ९ ते १० टन उत्पादन निघाले.