Farmer Success story: महाराष्ट्रातला शेतकरी पारंपारिक शेती बरोबर फळबाग लागवडीकडे ही मोठ्या लक्ष देताना दिसतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय पद्धतीनं पिकणाऱ्या फळांना आजकाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते. हे लक्षात घेऊन अवघ्या तीन एकरात डाळिंबाची लागवड करत निमगावचा शेतकऱ्यांनं शिवारातलं डाळिंब थेट दुबईच्या मार्केटमध्ये विकत तब्बल 52 लाख रुपयांची कमाई केली आहे. 


दुबईच्या मार्केटमध्ये डाळिंबाची हातोहात विक्री


निमगावच्या नागनाथ शिंदे आणि बंडू शिंदे या दोघांनी तीन एकरात केसर जातीच्या डाळिंबाची 1300 रोपं लावली. प्रति एकर चार ट्रेलर शेणखत देत सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या झाडांवरून वीस किलो डाळिंबाचे उत्पन्न यंदा या दोन्ही शेतकऱ्यांनी घेतलं. 200 ते 400 ग्रॅम वजनाचं एक डाळिंब दुबईचा मार्केटमध्ये हातोहात विकलं जातंय. 


उत्पादनात वाढ झाली, डाळिंब शेतीतून साधली आर्थिक प्रगती 


यंदा या दोन्ही भावांनी डाळिंब शेतीत गांडूळ खताचा वापर केला. तसेच झाडांचं संरक्षण करण्यासाठी सेंद्रिय खत वापरत पाण्याचे नियोजन केले. या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यामुळेच डाळिंबाचं वजन वाढवून गोडवा ही वाढला. गोगलगाय इत्यादींपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी एकरी 6 किलो गांडुळे टाकली. यामुळे जमिनीची सुपीकता आणि गांडुळांची संख्या वाढली. याशिवाय बागेतील तुषार व गंज रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी विशेष खबरदारी घेतली.एका झाडाला सरासरी 20 किलो डाळिंबाचे उत्पादन घेत दुबईला निर्यात केल्याचं ते सांगतात. 


एकरी खर्च अडीच ते तीन लाखांचा


तीन एकरात डाळिंबासाठी या शेतकऱ्याला 7.5 लाखांचा खर्च आला. यंदा त्यांची कमाई 52 लाखांची आहे. तीन एकरात 30 टन डाळिंबाची निर्यात या शेतकऱ्यांनी केली आहे. प्रति एकर अडीच लाख रुपये खर्च आल्याचे शेतकरी सांगतात. डाळिंबाचे व्यापारी स्वत: त्यांच्याकडे आले आणि 180 रुपये किलो दराने डाळिंब खरेदी करून दुबईला निर्यात केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या 3 एकर जमिनीतून आतापर्यंत एकूण 30 टन डाळिंबाची निर्यात झाली आहे.


हेही वाचा:


Farming success story: इंजिनिअर म्हणून 30 वर्षे केलं काम, आता घरातल्या छोट्या खोलीत केशरशेती करून महिन्याला कमवतात 3.5 लाखांचा नफा