Farmer Success Story: जळगावची केळी ही महाराष्ट्रात सर्वात लोकप्रीय समजली जाते. दर्जेदार उत्पन्नासह देशातच नाही पण परदेशातही निर्यात करण्यावर शेतकरी भर देत असल्याचं दिसतं. आता जळगावच्या भडगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं केळीची निर्यात करत लाखोंमध्ये नफा कमावलाय. राजेंद्र पाटील या शेतकऱ्याच्या शिवारातल्या केळीचा डंका आता आखाती देशात वाजतोय. इराणमध्ये निर्यात करत एकरी अव्वल उत्पादन त्यांनी घेतलंय. त्यांच्या एका केळीच्या घडाचं वजन तब्बल ३५ किलो आहे. एरवी प्रतिक्विंटल १२०० ते १४०० रुपयांचा भाव केळीला मिळत असताना निर्यात करत क्विंटलमागे तब्बल १७५० रुपयांचा भाव त्यांना मिळतोय.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत फळबागा जपणं तसं कठीण काम. बदलत्या हवामानात टिकाव धरत भरघोस उत्पन्न मिळवत या शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवल्याचं दिसतंय.
गिरणा नदीच्या समृद्ध तालुक्यांमध्ये केळीचं उत्पादन
जळगाव केळीचं आगार समजलं जातं. पाण्याचं योग्य नियोजन करत जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात केळीचं उत्पादन घेतलं जातं. गिरणा नदीच्या पाण्यानं समृद्ध असणाऱ्या पाचोरा आणि भडगाव परिसरात केळीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. याच भडगाव तालुक्यातील राजेंद्र पाटील या केळी उत्पादक शेतकऱ्यानं आपली केळी थेट इराणला निर्यात करत चांगला नफा कमावलाय. साधारण ३५ ची रास त्यांच्याकडे असून प्रतिक्विंटल १७५० रुपयांचा नफा त्यांना मिळाला आहे.
परदेशी निर्यात करत लाखात कमाई
राजेंद्र पाटील यांची सहा एकर शेती असून त्यांनी 9000 टिश्यूकल्चर केळीच्या रोपांची लागवड केली आहे. सध्या त्यांच्या शेतात केळीची काढणी सुरु असून देशांतर्गत आणि परदेशीही ते केळी पाठवतात. इराणमध्ये राजेंद्र पाटील यांच्या केळीला वाव मिळाला असून त्यांना भरघोस उत्पन्न घेतलं आहे. केळीला साधारणपणे १२०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असताना १७०० रुपयांचा भाव त्यांना मिळाल्यानं विक्रमी कमाई त्यांनी केल्याचं बोललं जातंय. खत, मशागत आणि पाण्याचे व्यवस्थापन करत भडगाव तालुक्यातून इराणला निर्यात करत केळीतून त्यांनी विक्रमी कमाई केली आहे.
केळीचा घड 35 किलोंचा!
साधारणपणे केळीच्या सामान्य घडाचं वजन २० ते २५ किलो एवढे असते. पण आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करत नियोजन साधल्याने या शेतकऱ्याच्या केळीच्या एका घडाचे वजन तब्बल ३५ किलोंचे भरले आहे. त्यामुळेच या केळीला चांगला भाव मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.