Farmer suicide : उसाला तोड येत नसल्यानं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातील जोहरापूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. जनार्धन माने असं आत्महत्या केलेल्या सत्तर वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शेतातच आहे. शेतकऱ्यांच्या उसाला तोड न आल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशातच उसाला तोड न आल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊस उचलल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे जनार्धन माने यांनी अगोदर आपल्या उसाला आग लावली आणि त्यानंतर विषारी औषध घेतले. त्यांना उपचारासाठी शहरातील नित्यसेवा रुग्णालयात दाखल केले होते. पण काल दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


मृत जनार्धन माने यांचा खामगाव शिवारात पावणे तीन एकर ऊस आहे. या आपल्या ऊसाला तोड मिळावी यासाठी महिनाभरापासून कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे ते चकरा मारीत होते. पंरतू, त्यांना फक्त पुढची तारीख दिली जात होती. गयावया करुनही ऊसतोड लाबंत चालल्याने गाळपाअभावी ऊस उभाच राहतो की काय या नैराशेत जनार्धन माने होते. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं त्यांचा मुलगा संतोष माने यांनी सांगितले आहे.


दरम्यान, राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र आहे. मात्र, सध्या ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याचे दिसत आहे. कारण वर्षभरात म्हणजे 12 ते 14 महिन्यांच्या आत ऊस कारखान्याला जाणे गरजेचे असते. मात्र, 17 ते 18 महिने पूर्ण झालेले काही शेतकऱ्यांचे ऊस अद्याप शेतातच आहेत. उसाला तोड न आल्याने त्यांचा ऊस अद्याप कारखान्याला गेला नाही. साखर कारखान्यांचे सभासद असूनही वेळेवर उसाला तोड येत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्याच्या उसाला तोड आली आहे. त्या शेतकऱ्यांकडे ऊस तोडण्यासाठी ऊसतोड कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर पैशाची मागणी होत आहे. तसेच ट्रॅक्टर आणि ट्रक ड्रायव्हरला प्रत्येक खेपेला एन्ट्री द्यावी लागत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ऊस कारखान्याला जात नसल्याचे शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: