मुंबई : खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी संपुष्टात आली. दरम्यान 31 जुलै अखेर राज्यातून 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर दाखल झाले आहेत. याव्दारे लाखो शेतकऱ्यांनी आपले पीक केवळ 1 रुपया विमा हफ्ता भरून आपले पीक विमा संरक्षित केले असल्याची माहिती राज्याचे  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.


शिवराज सिंह चौहान यांना विनंती करून 31 जुलै पर्यंत मुदतवाढ 


प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा पोर्टलच्या वतीने सुरुवातीला 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बरेच शेतकरी तेव्हा विमा भरण्यापासून वंचित राहिल्याने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विनंती करून 31 जुलै पर्यंत मुदतवाढ करून घेतली होती. 15 जुलै नंतर अखेरपर्यंत 21 लाख 90 हजार अर्जांची त्यामुळे वाढ झाली आहे. दरम्यान राज्यात एकूण 97% पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 10 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. तर एकूण विमा संरक्षित रक्कम ही 53 हजार 886 कोटी इतकी आहे. 


केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला


एकूण विमा हफ्ता हा सुमारे 7959 कोटी इतका निश्चित असून, त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे 1 कोटी 65 लाख, राज्य हिस्सा एकूण 4725 कोटी, त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा 3232 कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा 1492 कोटी इतका निश्चित करण्यात आला असून केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे.


दरम्यान मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सुमारे 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते तर संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विम्या पोटी आतापर्यंत 7280 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 4271 कोटी पिक विम्याचे वाटप पूर्ण झाले असून आणखी 3009 कोटी रुपयांचे वितरण सध्या सुरू असून अंतिम पीक कापणी अहवालाचे काम 100% पूर्ण झाल्यानंतर या रकमेत आणखी वाढ होणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.






इतर महत्वाच्या बातम्या 


Amol Mitkari on Ameya Khopkar : अमोल मिटकरी घासलेट चोर, पुन्हा थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार; अमेय खोपकर यांचा इशारा