Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी (Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण बदलत्या हवामानाचा (Climate Change) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. कुठे अवकाळी तर कुठे उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहे. नांदेड जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं कंधार तालुक्यातील बारुळ येथील शेतकऱ्याच्या केशर आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. मोठ्या कष्टानं उभारलेली बाग अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं वाया गेली आहे.
या हंगामात तीन लाख रुपयाचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती
कंधार तालुक्यातील बारुळ येथील प्रकाश बळीराम वाखरडे या तरुण शेतकऱ्यानं व्यवसाय करत गावाकडील खडकाळ जमिनीवर तीन एकरात नैसर्गिक पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलवली आहे. केशर आंब्याला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. शिवाय चांगला भाव मिळाल्याने एका हंगामातच तीन लाख रुपयाचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपीटीने खडकाळ जमिनीवरील सगळ्या आंब्याच्या बागेचं नुकसान झालं आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी प्रकाश बळीराम वाखरडे यांना बसला आहे.
अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार गेल्या आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं बारुळ, तालुका कंधार येथील प्रकाश बळीराम वाखरडे या शेतकऱ्याचे मोठं नुकसान केलं आहे. नांदेड येथे व्यवसाय करत असताना प्रकाश वाखरडे यांनी आपल्या शेततात केशर आंबा आणि चिकू बागेची लागवड केली होती. चागलं उत्पन्न होईल या अपेक्षेने खडकाळ जमिनीची त्यांनी चांगली देखभाल केली. मात्र, अवकाळी पावसाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं आहे.
प्रकाश बळीराम वाखरडे यांनी खडकाळ जमिनीवर आंब्याची बाग आणि चिकूची बाग केली आहे. बागेची लागवड करताना त्यांनी खड्ड्यामध्ये पहिला थर बुरशीनाशक पावडरचा टाकला. दुसऱ्या थरामध्ये पाला पाचोळा टाकला. तिसऱ्या थरामध्ये माती टाकण्यात आली आणि चौथ्या थरामध्ये शेणखत टाकण्यात आले. शेवटी माती टाकून पुन्हा त्याला अजून दहा दिवस तळू देण्यात आले. त्यानंतर जूनमध्ये त्यांनी आपल्या शेतात तयार केलेल्या खड्ड्यामध्ये 30 बाय 30 वर 60 आंब्याची झाडे आणि 120 चिकूची झाडे नैसर्गिक पद्धतीने लागवड केली. चार वर्षे सदरच्या झाडाला फळधारणाही होऊ दिली नाही. तसेच चार वर्षमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन आणि भुईमूग घेतले होते. यावर्षी आब्याच्या बागेला चांगले फळ लागले होते. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे.