Beed Agriculture News : अतिवृष्टीचा खूप मोठा फटका राज्यातील काही भागात बसला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सोयाबीन (Soybean) पिकावर गोगलगायीचा (Snail) प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं पिकांच मोठं नुकसान झाल्यानं मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे देखील गोगलगायीमुळं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि गोगलगायीमुळं झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पाच कोटी छत्तीस लाख रुपयांच्या निधीची मागणी बीडच्या जिल्हा प्रशासनानं केली आहे.
बाधित क्षेत्राचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवला, 13 हजार 119 शेतकऱ्यांचे नुकसान
बीड जिल्ह्यामध्ये जून आणि ऑगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे गोगलगायीमुळं देखील शेती पिकाचं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने केले असून, याच पंचनामाच्या आधारे बीडच्या जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाच कोटी छत्तीस लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्याचबरोबर विभागीय आयुक्तांना देखील 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचा अहवाल पाठवण्यात आला असून, यामध्ये 13 हजार 119 शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे.
33 टक्क्यांपेक्षा नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत
अतिवृष्टी आणि गोगलगायीमुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या पिकाला फटका बसला होता. तर गोगलगायमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद नसल्याचे कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, काही शेतकरी संघटना, राजकीय पक्षांनी सतत या नुकसान भरपाईची मागणी लावून धरली होती. त्यानंतर 33 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यामध्ये बीड, केज आणि अंबाजोगाई या तीन तालुक्यांमध्ये 33 टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र आहे. तर गेवराई, पाटोदा, धारुर या तालुक्यात 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान न झाल्यानं हे तालुके मदतीपासून वगळण्यात आले आहेत. त्यामुळं ज्या शेतकाऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना भरपाईपोटी पाच कोटी छत्तीस लाख रुपयाच्या निधीची मागणी बीडच्या जिल्हा प्रशासनाने केली आहे.
सोयाबीनसह अन्य पिकांना गोगलगायींने मोठ्या प्रमाणात ग्रासलं आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावानं उगवलेली सोयाबीन पिकं पूर्णत: नष्ट झाली आहेत. तर सोयाबीनसह इतरही पिकांना गोगलगायीच्या नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. याबाबत कृषी आणि महसूल यंत्रणेने तत्काळ पंचनामे करुन राज्य सरकारनं संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या: