Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी संकटात आहे. एकीकडं आस्मानी संकट आहे, तर दुसरीकडं सुलतानी संकट आहे. या दोन्ही संकटात शेतकरी मात्र भरडला जातोय. राज्यात पावसानं (Rain) दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडं शेतमालाला योग्य तो दर नसल्यानं शेतकऱ्यांना फटका बसतोय. कोथिंबीरला (coriander crop) भाव नसल्यामुळं एका शेतकऱ्यानं संपूर्ण एक एकर क्षेत्रावरील कोथिंबीरीवर ट्रॅक्टरने रोटर फिरवला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रांधे गावचे गोरखदादा आवारी असं या शेतकऱ्याचे नाव आहे. 


कोथिंबीरीला भाव नसल्यामुळे गोरखदादा यांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या पिकाचा उत्पादन खर्चही निघणं कठिण झालं होतं. त्यामुळं त्यांनी संपूर्ण एक एकर कोथींबीरीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. शेतीमालाला भाव नाही, पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगवा की मरावं? सरकारनं लवकरात लवकर हमीभाव  ठरवून दिला पाहिजे नाहीतर एक दिवस उपाशी राहण्याची वेळ येईल असे शेतकरी आवारी म्हणाले. 


पिकाचा उत्पादन खर्चही निघणं कठिण


एकीकडे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. दुसरीकडे एकही भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच शेतकऱ्याला कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आली आहे. सरकारला जाग तरी केव्हा येणार असा सवाल या शेतकऱ्याने केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांदा दर घसरल्याने शेतकरी संतप्त असून दुसरीकडे सरकार वारंवार आश्वासन देत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे कांद्याला कांद्याला भावच नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकावर नांगर फिरवल्याचे देखील दिसून आले. कांद्याबरोबर इतर पीक घेणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. लागवड केलेल्या पिकातून उत्पादन खर्च तर सोडाच पण मालाचा वाहतूक खर्च देखील निघत नाही.


दरम्यान, मागील काही दिवसापूर्वीच नाशिक जिल्ह्याती दिंडोरी तालुक्याती एता शेतकऱ्यानं कोथिंबीरला भाव मिळत नसल्याने शहरातील दिंडोरी नाका परिसरात कोथिंबीर फुकट वाटली होती. शेतकरी जर जगला तर सगळे लोक जगतील. मध्यमवर्गीय असतील, मोठे लोक असतील, गोरगरीब असतील सगळे शेतीमालावर अवलंबून आहे. मात्र जर कचऱ्यापेक्षा वाईट परिस्थिती जर शेती मालाची आहे. त्यामुळे आज रस्त्यावर आम्हाला यायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना तिथे बाजार समिती रेट देत नसल्याची भूमिका शेतकऱ्याने व्यक्त केली होती.


महत्त्वाच्या बातम्या:


साहेब आम्ही मरायचं का? शेतकऱ्यांने कोथिंबीर फुकट वाटली, नाशिककरांची झुंबड