मुंबई : केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क (Duty On Onion Exports) लागू केले आहे. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. केंद्र सरकारकडून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मोठा संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची प्रतिक्रिया आली आहे. 'मी केंद्राच्या संपर्कात; गरज पडल्यास दिल्लीला जाणार', असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. 


केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यावर धनंजय मुंडे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मी केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. तर, वेळ पडल्यास शेतकऱ्यांचा हितासाठी दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तसेच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी नक्कीच आम्ही मार्ग काढू असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. 


शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट... 


मागील काही दिवसांत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. काही ठिकाणी दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः कांदा रस्यावर फेकून दिला होता. त्यातच मागील आठवड्याभरात कांद्याचे दर काही प्रमाणात वाढताना पाहायला मिळत असतानाच, आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर दर घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयानंतर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पाहायला मिळत आहे. 


धनंजय मुंडेंची सभेपूर्वी आढावा बैठक... 


दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा आहे. त्याच सभेच्या निमित्ताने आज मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये सभेपूर्वीच्या तयारीच्या बैठकीचे आयोजन केले. हॉटेल सनराईस येथे बैठक झाली असून, या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार गटामध्ये सामील झालेले राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, अमरसिंह पंडित यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये शरद पवार यांची स्वाभिमान सभा झाली होती. या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत नेमकं अजित पवार इतर मंत्री नेमक काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. याच सभेच्या पूर्व तयारीसाठी धनंजय मुंडे यांना बीडमध्ये बैठक घेतली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Onion Price : कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क, केंद्र सरकारचा निर्णय; 31 डिसेंबर 2023 पर्यंत निर्णय लागू