यवतमाळ :  निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. अशावेळी या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पिक विम्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सरकारनेदेखील शेतकऱ्यांना पिक विमा (Crop Insurance) वाटप होणार असल्याची घोषणा दिवाळीपूर्वी करण्यात आली होती. राज्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा झाली आहे. मात्र, काहींसाठी ही रक्कम म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला आहे. 


यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा कंपनीकडून थट्टा केली जात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2 रुपये, 3 रुपये, 33 रुपये अशी तुटपुंजी मदत खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे 


यवतमाळ जिल्ह्यात 8 लाख 44 हजार 757 शेतकऱ्यांनी 1 रुपये मध्ये पीकविमा योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील पहिला टप्पा म्हणून जिल्ह्यातील 59 हजार 404 शेतकऱ्यांचा पीक विमा जमा झाला. एकूण 41 कोटी 10 लाख रुपयांचा शेतकऱ्यांना पीकविमा जमा झाला. मात्र त्यात काही शेतकऱ्यांना 2 रुपये, 3 रुपये पिकविम्याचा मोबदला मिळाला आहे. 


1 रुपये शेतकऱ्याने भरावे त्याचे प्रीमियम हे राज्य सरकार कडून भरण्यात आले. त्यापोटी विमा कंपनीला राज्य सरकारने 5 अब्ज 9 कोटी 11 लाख 18 हजार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भरले. 5 लाख 25 हजार 541 शेतकऱ्यांपैकी 59 हजार शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे. ही मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांची थट्टा करणारी असल्याचे शेतकरी सांगतात. 


या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी लवकरच शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देणार असून विमा काढताना नुकसान भरपाई देण्याचे असून शेतकऱ्यांच्या तक्रारी साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे विमा काढताना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन विमा कंपनीने दिले आहे. 


प्रत्यक्षात शेतशिवारात खत, बियाणे, औषधी आणि इतर खर्च हजारांपेक्षा अधिक आहे. असे असतानाही कंपनीने दोन ते तीन रुपयांची नुकसान भरपाई देताना नेमके निकष काय वापरले हा आता संशोधनाचा विषय बनला आहे. पिक विमा कंपन्यांकडून एवढी तुटपुंजी रक्कम दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचा फायदा होत आहे का, असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागला आहे.