Mahadev Jankar on Milk : राज्य सरकारने गायीच्या दुधाला किमान 50 रुपये लिटरला दर द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केली आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जानकर यांनी चक्क गायीची काढत ही मागणी केली आहे. इंदापूर तालुक्यात चिखली गावामध्ये त्यांनी गोठ्यावर जाऊन, शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकारने दुधाला वाजवी दर द्यावा अशी मागणी महादेव जानकर यांनी केलीय.


इंदापूर तालुक्यात चिखली गावामध्ये जानकर यांनी गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गायीच्या दुधाला प्रती लिटर 50 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. लिटरला शंभर रुपये जरी दर दिला तरी परवडेल, मात्र मी राज्य सरकारला अतिशयोक्ती मागणी करणार नाही. तरी त्यांनी किमान 50 रुपये तरी दुधाला दर द्यावा अशी मागणी करत असल्याचे जानकर म्हणाले.


दरम्यान, सध्या पेंड तसेच चारा देखील महागला आहे. त्यामुळे राबणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे कमी मिळतात. शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय शेतकरी करतात. मात्र, सध्या शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्यावर कर्जबाजारीपणाची वेळ देणार नाही असे सरकारने प्रयत्न करावे असे जानकर यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रपंच सुधारुन मुले देखील उच्चशिक्षित होतील. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करत जानकर यांनी गाईच्या दुधाला 50 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. मी देखील दुग्ध विकास मंत्री होतो याची आठवण करुन देत जानकर यांनी गायीची धार काढत ही मागणी केली.


सध्या गाय-म्हशींच्या खाद्य आणि चाऱ्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुग्ध उत्पादक दोन्हीकडून आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे शासन दूध उत्पादन वाढवण्याचे आवाहन करीत आहे; परंतू दुसरीकडे दुग्ध व्यवसायाला शासनाकडून प्रोत्साहन मिळत नाही. शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक, पशुपालक मेटाकुटीला आले आहेत.