Cotton Price News : सध्या बाजारपेठेत कापसाच्या दरात घट झाल्याचे चित्र दिसत आहे. सद्या भारतीय बाजारपेठेत कापसाला प्रति 100 किलोला 8 ते 9 हजार रुपयांचा दर मिळत आहे. कापसाच्या दरात सध्या मोठी घट झाली आहे. कारण कापसाला 12 हजार रुपयांचा दर मिळत होता. कापसाचे दर उतरु लागल्यानं वस्त्र उद्योगाला नवी चिंता सतावण्याची शक्यता आहे. चालू खरीप हंगामात कापसाचे पीक अधिक येण्याची शक्यता असल्यानेचं कापसाच्या दरात घसरण होत आहे. 



आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात घट


दरम्यान, हे कापसाचे दर कमी होण्याची नेमकी कारण काय आहेत. याचा परिणाम काय होईल याबाबत एबीपी माझा डीजिटलने नागपूरचे ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या कापसावरचे आयात शुल्क काढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर 15 ते 20 टक्के कमी झाले आहेत. त्याचा परिणाम देखील भारतीय बाजारपेठांवर होत असल्याची माहिती वैराळे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन यावर्षी वाढण्याचा अंदाज आहे. देशातील उत्पादन सुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. क्षेत्र वाढत आहे, त्यामुळं किंमती कमी होत असल्याची माहिती वैराळे यांनी दिली. नुकसान वाचवण्यासाठी देशातील अनेक मील बंद ठेवल्या आहेत. त्याचा देखील किंमती कमी होण्यावर परिणाम होत आहे.


सूतगिरण्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती


आता कापूस दर कमी झाल्याने सुताचे दरही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पण चढ्या दरानं कापूस घेतला असताना सूत कमी दराने विकावे लागल्याने सूतगिरण्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कापूस दर कमी होणे हा बाजारपेठेला दिलासा असला तरी सूतगिरण्यांना तो त्रासदायक ठरला आहे. सुताचे दर कमी झाले तर त्याचा यंत्रमागधारकांना फायदा होऊ शकतो.


सुताच्या भावात प्रतिकिलो 50-60 रुपयांची घसरण,  वस्त्रोद्योग करणारे व्यावसायिक चिंतेत 


मागील वर्षी महाराष्ट्रात कापसाच्या लागवडीमध्ये प्रचंड घट झाली होती. परिणामी कापसाला चांगलाच भाव मिळू लागला होता. याचाच परिणाम म्हणून काही सूतगिरण्या आणि टेक्स्टाईल व्यवसायकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतू हा आनंद जास्त काळ काळ टिकला नाही. कापूस उत्पादन घेणाऱ्या राज्यापैकी महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. परंतु गेल्या वर्षी महाराष्ट्रात सुद्धा कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. कापसाचे भाव तेजीत होते. त्यामुळं सूतगिरण्या आणि टेक्सटाईल व्यवसायामध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतू आता कापसाच्या भावामध्ये मोठी घट झाल्यानं हेच सूतगिरणी आणि टेक्स्टाईल व्यवसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. चालू खरीप हंगामात कापसाची लागवड वाढल्यानं कापसाचे दर अजून घसरु शकतात. परिणामी सुताचे भावही घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग करणारे व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.


मार्च - एप्रिल महिन्यामध्ये कापसाचे भाव तेजीत होते. तेव्हा सुताचेही भाव प्रति किलो 200 ते 210 रुपये असे होते. आता हे दर 25 टक्क्यांनी घसरलेले असून सध्या सुताचे दर हे प्रति किलो 150 ते 160 आहेत. त्यामुळं प्रति किलोत 50 ते 60 रुपयांची घसरण झाली आहे.


कापसाचे दर वाढण्याची शक्यता नाही


कापसाचे दर 12 हजार रुपयापर्यंत गेले होते. मात्र, सध्या कापसाला 8 ते 9 हजार रुपयांचा दर मिळत आहे. सध्या काही शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. त्यांना मात्र, याचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे वैराळे म्हणाले. दरम्यान, सध्या कापसाचे दर वाढण्याची शक्यता दिसत नाही. दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दर साधारणत: सात ते साडेसात हजार रुपयापर्यंत कमी होतील असेही वैराळे म्हणाले.


मागील वर्षी पाऊस आणि रोगराईमुळं कापसाच्या दरात वाढ


कापूस दरानं वस्त्रोद्योगाचं अर्थकारण विलक्षण विचलित झाले आहे. गेल्या वर्षी दिवाळीनंतर हंगामात कापसाचे दर वाढू लागले होते. पावसामुळं झालेले नुकसान, रोगराईचा प्रादुर्भाव यामुळं कापसाचे पीक कमी आले होते. कापसाची उपलब्धता कमी झाल्यानं सुरुवातीपासून कापसाच्या दरात मोठी वाढ झाली होती. यावर्षीच्या सुरुवातील कापसाचा दर हा 12 ते 13 हजार रुपयापर्यंत गेला होता. आता मात्र, कापसाचे दर उतरत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षी कापसाचे उत्पादन जास्त राहण्याची शक्यता आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, हरियाणा, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यात कापसाचे उत्पादन चांगले असते. महाराष्ट्रातही चांगल्या पावसामुळं कापसाचे पीक चांगल्या प्रकारे उगवले आहे. गेल्या हंगामात पांढऱ्या सोन्याचा दर चांगला वाढला होता. त्यामुळं कापसाचे पीक घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल आहे. 


महत्वाच्या बातम्या: