White Sandalwood Farming : कमी खर्चात जास्त नफा देणारे झाड म्हणून 'पांढरे चंदन' (White Sandalwood Farming) याकडे बघितलं जातं. या झाडांच्या लागवडीतून शेतकरी (Farmers) मोठा नफा मिळवू शकतात. मात्र यासाठी तुम्हाला काही वर्षे वाट पाहावी लागेल. गोरखपूर जिल्ह्यातील जंगल सालिक गावात राहणाऱ्या अविनाश कुमार यादव (Avinash Kumar Yadhav) यांनी देखील पांढऱ्या चंदनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी पूर्वांचलमध्ये पांढर्‍या चंदनाच्या लागवडीचा पाया घातला आहे. येत्या 10 वर्षानंतर यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या पुढाकारामुळं जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता पांढर्‍या चंदनाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.


कमी वेळात जास्त नफा 


शेतकरी अविनाश कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2012 मध्ये त्यांच्या मनात पांढरे चंदन लागवड करण्याचा विचार आला. एक प्रयोग म्हणून आम्ही शेतात 5 ते 7 झाडे लावली होती. पांढर्‍या चंदनाच्या लागवडीमुळं भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. म्हणून पुन्हा 2017 ते 18 मध्ये आम्ही कर्नाटकातून 50 पांढर्‍या चंदनाच्या रोपांची लागवड केली. यावेळी एका रोपाची किंमत 200 रुपये होती. अविनाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझा लहानपणापासूनच शेतीकडे कल होता. त्यामुळं त्यांनी आत्तापर्यंत देशातील 80 कृषी विज्ञान केंद्रे आणि 25 कृषी विद्यापीठांना भेटी देऊन शेतीच्या नवीन तंत्रांची माहिती घेतली आहे. त्यांनी त्यांच्या शेतात चंदनाचे रोपटे लावले असून ते आता हळूहळू वृक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पांढर्‍या चंदनाची लागवड हे कमी वेळात जास्त नफा देणारे पीक आहे.


ओसाड जमिनीवरही लागवड 


पांढर्‍या चंदनाच्या झाडांना फारशी काळजी घेण्याची गरज नसते. पहिल्या एका वर्षात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ओसाड जमिनीवरही त्याची लागवड करता येते. त्यासाठी कमी पाणी लागते. पांढर्‍या चंदनाच्या झाडाची उंची 18 ते 25 फूट असते. ते तयार होण्यासाठी 12 ते 15 वर्षे लागतात. पांढर्‍या चंदनाच्या वाढीसाठी आधार देणार्‍या वनस्पतीची गरज असते.


एक एकर जमिनीवर पांढर्‍या चंदनाची 500 रोपे लावता येतात


पांढर्‍या चंदनाचा वापर औषधे, साबण, अगरबत्ती, कंठी जपमाळ, फर्निचर, लाकडी खेळणी, अत्तर, हवन वस्तू आणि परदेशात खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. अविनाश यांच्या म्हणण्यानुसार, एक एकर जमिनीवर पांढर्‍या चंदनाची 500 रोपे लावता येतात. रोपांमध्ये किमान 10 फूट अंतर असणे आवश्यक आहे. एका एकरात पांढर्‍या चंदनाचे रोप लावण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो.


चंदन विकून 1 कोटी 90 लाख रुपये मिळणार 


तुमच्याकडे जर एक एकर जमीन असेल आणि तुम्हाला शेती करण्याचा करायची असेल तर तुम्ही चंदनाची लागवड करु शकता. यामध्ये 1 लाख रुपये गुंतवून तुम्ही 12 ते 15 वर्षात 60 लाख रुपयांचा नफा मिळवू शकता. लाकडाची किंमत 10 ते 15 हजार रुपये किलो असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 25 ते 30 हजार रुपये किलो असल्याची माहिती अविनाश यांनी सांगितली. काही वर्षांनी माझी सर्व पांढरी चंदनाची झाडे विकायला तयार होतील, ज्यातून मला सुमारे 1 कोटी 90 लाख रुपये मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पांढर्‍या चंदनाच्या लागवडीसाठी कोणतीही विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया नाही. मात्र, कोणतेही झाड तोडण्यापूर्वी ज्याप्रमाणे वनविभागाची परवानगी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे पांढरे चंदनाचे झाड तोडण्यापूर्वी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते.