मुंबई : सोशल मीडिया सगळ्यांना वेड लावणारे आणि वेळ खाणारे माध्यम झाले आहे. तासनतास घरी, कामाच्या ठिकाणी फोनवर रिल्स बघत अनेक लोक वेळ घालवत असतात. यात रोज नवनवीन ट्रेंड्स, त्यामुळे रील बघणे आणि करणे या लोक मग्न झालेत. अनेक लोक रिल्सच्या माध्यमातून चांगले संदेश पोहोचवतात, काही लोक याकडे व्यवसाय म्हणून बघतात, काही ब्रँड्स रिल्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांचे काम आणि प्रॉडक्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तर काही याकडे फक्त एन्टरटेन्मेंटचे माध्यम म्हणून बघतात. रिल्सवर अनेक ट्रेंड व्हायरल होत असतात. त्यात गाणी असतात, म्युसिक कव्हर असतात, तर काही डान्सचे रील देखील असतात. अनेकदा काहीही लॉजिक नसलेले मात्र बघायला आणि बनवताना मजा येते म्हणून ट्रेंड होणारे अनेक रील देखील बघायला मिळतात. यात नुकताच व्हायरल झालेला एक ट्रेंड म्हणजे 'मोय मोय'. आता हा ट्रेंड नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
'मोये मोये' ही ट्यून सर्बियन गायक-गीतकार तेया डोरा हिच्या 2023 मधील 'दजानुम' गाण्याच्या कोरसमधील आहे, ज्याला आता यूट्यूबवर 60 मिलियनपेक्षा अधिक व्हियुज आहेत. पण खरंतर या गाण्यात कोरस मध्ये 'मोजे मोरे' ( ज्याचा उच्चार 'मोये मोरे' असा केला जातो ) शब्द वापरले आहेत. पण इंटरनेटवर त्याचा अपभ्रंश होऊन ते 'मोये मोये' म्हणून भारतात गाजले आहे.
आता याचा अर्थ काय ?
मोये मोरे चा अर्थ असतो 'My Nightmares' म्हणजेच दुःस्वप्न. या गाण्यात ती तिच्या वेदना, नकारात्मक भावना व्यक्त करतेय. आपल्यावर कुणीही प्रेम करत नाही, आपले नशीब चांगले नाही असं ती यामधून सांगतेय. 'मोरे' हा शब्द सारखा वापरला गेलाय, कारण त्यातून असे सांगण्यात येत आहे की, ती निराश आहे मात्र कधीतरी आपले भविष्य सुखकर होईल अशी आशा व्यक्त केली जातेय.
आता हा ट्रेंड आक्षेपार्ह का आहे?
अशी अनेक गाणी आपण बघतो, ऐकतो जी रिल्सवर ट्रेंड होतात मग यात इतकं आक्षेपार्ह काय? तर सुरुवातीला हे गाणं फेमस झालं आणि टिकटॉकवर हजारो लोकांनी यावर रील बनवले. मग युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे हे दिसायला सुरुवात झाली. अनेक लोकांनी बनवलेले रिल्स बघून मजा येत होती, टाईमपास होत होता, मात्र नंतर बऱ्याच रीलमध्ये काही वेगळंच दिसायला लागलं. अनेक रिल्समध्ये एखादी व्यक्ती अशी दाखवली जाते जिला हात किंवा पाय नाही. ती व्यक्ती एखाद्या व्यक्तीकडे मदत मागते आणि समोरची व्यक्ती उलटून उत्तर देते. त्यानंतर लक्षात येतं की या व्यक्तीला हात नाहीत म्हणून ही व्यक्ती मदत मागत आहे आणि मग मोय मोय वाजायला सुरुवात होते. अशा पद्धतीच्या रिलमधून नेमकं काय दाखवायचे आहे असा प्रश्न पडतो.
एखद्या व्यक्तीच्या अपंगत्वाची या रिल्समधून खिल्ली उडवली जाते. खरच एखाद्याला हात नसणे, पाय नसणे आणि तरीही आयुष्य जगत राहणे हे इतकं सोपं आहे का? आधीच आपल्याकडे जगात अपंगत्व नशिबी आलेल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला आणि positive नाही, त्यांच्याकडे एक जबाबदारी, कटकट, ओझं म्हणून बघितलं जातं त्यात असे रिल्स तयार केल्याने आपल्या समाजात किती क्रुरता आणि द्वेष भरलाय असं लक्षात येतं. परानुभूती जाऊदे किमान सहानुभूती तरी वाटावी. बरं तेही नसेल तर किमान एखादा ट्रेंड घेऊन अशी खिल्ली उडवू नये, तेही अशा लोकांची ज्यांच आयुष्य आधीच अवघड आहे. लोकांच्या असंवेदनशील वागण्याने आणि भारतात होणाऱ्या गैरसोयीमुळे आणखी अवघड होत असतं
बर एखादं आक्षेपार्ह रिल बघून पण अनेकदा हसू येतं किंवा एका विशिष्ठ प्रकारच्या लोकांना तसे रील आवडतात. मात्र सध्या सोशल मीडियावरचं मोये मोयेवर बनवलेलं एकही रील बघून त्यामध्ये आणखी इंट्रेस्ट तर वाटत नाहीच पण आपण काय पातळीचा कंटेंट बघतोय याची देखील लाज वाटते. डार्क ह्युमरच्या नावाखाली किती असंवेदनशीलता सहन करायची? आणि का? मी काही moral compass घेऊन सगळ्यांनी कसं वागायला हवं, काय बघायला हवं असं सांगणार नाही किंबहुना मला तो अधिकार नाही.
पण एखादा ट्रेंड आला म्हणून तो फॉलो करायलाच हवा का? एखादी ट्रेंड होणारी गोष्ट चुकीची आहे हे माहिती असून पण काही हजार व्ह्यूज आणि लाईकसाठी ती फॉलो करणं इतकं सोशल मीडियामुळे वाहवत जाणं योग्य आहे का, इतके आंधळे, बहिरे आणि तत्वशून्य खरंच झालोय का असा प्रश्न स्वतःलाच विचारा...