Mahabeej seeds : सध्या राज्यातील शेतकरी खरीप पेरणीची तयारी करत आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना महाबीजचे प्रमाणित बियाणं अनुदानीत दरात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 10 वर्षाच्या आतील आणि 10 वर्षावरील कडधान्य पिकांच्या नवीन वाणांचा शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य व गळीतधान्य पिका अंतर्गत भात, तूर, मूग, बाजरी व सोयाबीन या पिकांसाठी अनुदानीत दरानं हे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


महाबीज तसेच त्यांच्या अधिकृत विक्रेत्याकडे प्रत्येक तालुक्यात भात, तूर, मूग, बाजरी व सोयाबीन या पिकांचे प्रमाणित बियाणे परमीटद्वारे उपलब्ध आहे. अनुदानीत दराने उपलब्ध प्रमाणित बियाण्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केलं आहे.


पिके, वजन आणि अनुदानित विक्री दर 


भात (को 51)- 25 किलो – अनुदानित विक्री दर 425 रुपये, 
भात (इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती) 25 किलो- अनुदानित विक्री दर 950 रुपये.
तूर (राजेश्वरी, बीडीएन 716, बीडीएन 711)  2 किलो- अनुदानित विक्री दर 180 रुपये
तूर (आय सी पी एल 8863 आशा) 2 किलो- अनुदानित विक्री दर 200 रुपये
मूग (उत्कर्षा, बी एम 2003-2)- 2 किलो पॅकिंग- 210 रुपये, मूग (बी एम 2002-1)- 2 किलो
अनुदानित विक्री दर 240 रुपये 
बाजरी (धनशक्ती)- 105 किलो अनुदानित विक्री दर 22.50 रुपये
सोयाबीन (फुले किमया, फुले संगम, एम ए सी एस 1188)- 30 किलो अनुदानित विक्री दर 3 हजार रुपये


दरम्यान, दडी मारुन बसलेला पाऊस जून महिना संपताना महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. या पावासामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याकडून पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील इतर भागात पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.