Buldana News : सध्या कांदा काढणीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढला असून वाढत्या तापमानामुळं कांदा खराब होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातच कांदा पडून आहे. बाजारात कांद्याला फक्त 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्यानं येत्या काही दिवसांत वादळी पावसाची शक्यता असल्याचं भाकीत केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न उभा आहे, अशा परिस्थितीत मात्र कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
सर्वच क्षेत्रात महागाईनं डोकं वर काढलेलं असताना ही मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच शेतमालाला भाव कमी मिळणं हे ठरलेलंच असतं. सध्या कांदा उत्पादक शेतकरीही अशाच काही अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडला आहे. सध्या कांदा काढणीचे दिवस आहेत. यावर्षी पावसाळा चांगला झाल्यानं शेतीला मुबलक पाणी मिळालं आणि शेतकऱ्यांनी कांदा घेण्याचं ठरवलं. ज्यावेळी कांदा लागवड केली, त्यावेळी कांद्याचे भाव प्रति क्विंटल तीन हजार रुपयांच्या घरात होते. चांगलं स्वप्न पाहून यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. मात्र कांदा काढणीला आला की, भाव कमी होतातच. सध्या कांदा व्यापारी कांदा घ्यायलाच तयार नाहीत, तर जे घेणारे आहेत ते पडलेल्या भावात म्हणजेच, 400 ते 500 रुपये क्विंटलनं मागणी करतात.
बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी विक्रमी म्हणजे, जवळपास 20 हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली. अर्थात सध्या कांदा काढणीला आला आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा कांदा काढून शेतात तयार आहे. पण भाव नसल्यानं आणि शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करण्यासाठी व्यवस्था नसल्यानं शेतकऱ्यांचा कांदा 40 अंशांवर तापमान असल्यानं उघड्यावरील कांदा मोठ्या प्रमाणात काळा पडून खराब होत आहे. तर येत्या दोन दिवसांत राज्यात काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यानं कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
एकीकडे यावर्षी शेतीसाठी मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी रेकोर्डब्रेक कांदा लागवड केली. पण कांद्याचे भाव गडगडल्यानं आणि कांदा साठवणुकीची साधनं नसल्यानं मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्याला द्यावा लागत आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या शक्यतेनं शेतकऱ्यांच्या विवंचनेत भर पडली आहे. जणू काही संकटे ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Success Story : लिंबाला सोन्यासारखा भाव, हिंगोलीतील शेतकऱ्याला अडीच एकरातून 13 लाखाचं उत्पादन अपेक्षित
- Pathadi Chinch Latur : लातूर जिल्ह्यातील पानचिंचोलीची 'पठडी चिंच' म्हणजे नैसर्गिक वरदान, पाहा काय आहे वेगळेपण
- Junnar Hapus : हापूस फक्त कोकणचाच, जुन्नरच्या हापूसला भौगोलिक मानांकन देण्यासाठी कोकणच्या शेतकऱ्यांचा विरोध