Potato Tomato Prices : सध्या बाजारात बटाटा (Potato) आणि टोमॅटोच्या (tomato) दरात चांगलीच घसरण झाल्याचे दिसत आहे. बटाट्याच्या दरात 30 टक्क्यांची तर टोमॅटोच्या दरात 20 टक्क्यांची घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. दर कमी झाल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बटाटा व्यापाऱ्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेने पीक रोखून धरले होते, परंतू, तसे झाले नाही. व्यापाऱ्यांना साठा सोडण्यास भाग पाडले आहे. त्यामुळं किमतींवर परिणाम झाला आहे. तर यावर्षी टोमॅटोचं उत्पादन चांगले झाले असताना दर खाली आले आहेत.
दरम्यान, पंधरवड्यापूर्वी घाऊक बाजारात एक किलो बटाट्याची किंमत 20 रुपये होती. ती आता 14 ते 16 रुपये प्रति किलोपर्यंत घसरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. किंमती कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावरही जाणवत आहे. तिथे किंमती 25 ते 30 टक्क्यांनी घसरल्या आहेत. बटाटा आणि टोमॅटोच्या पुरवठ्यात वाढ झाली आहे. पुरवठा सुधारल्यानं किंमती घसरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, किंमती आणखी वाढतील असे वाटल्यानं व्यापाऱ्यांनी स्टॉक रोखून धरला होता. मात्र, अलीकडच्या काही महिन्यांत बटाट्याचे भाव स्थिर राहिले होते. त्यामुळं किंमती आणखी वाढणार नाहीत, असे समजल्यानेच व्यापाऱ्यांनी बटाटा विक्रीसाठी बाहेर काढला आहे.
दर उतरल्यामुळं माल खरेदीचं प्रमाण कमी
यावर्षी देशातील बटाटा पिकाचे उत्पादन 53.58 दशलक्ष टनांवर गेलं आहे. ते मागील वर्षीच्या तुलनेत 30 लाख टन कमी आहे. सध्या बटाटा आणि टोमॅटोचा पुरवठा देखील वाढला आहे. त्यामुळं टोमॅटोचे भाव 20 रुपये प्रति किलोवरून 15 रुपये प्रति किलोपर्यंत घसरले आहेत. टोमॅटो विकण्यासाठी शेतकऱ्यांना खरेदीदार सापडत नाहीत. कारण दर उतरल्यामुळं व्यापाऱ्यांनी देखील खरेदी कमी केल्याची माहिती मिळत आहे. जगाच्या एकूण टोमॅटो उत्पादनाचा विचार केला तर भारताचा वाटा हा 10 टक्के एवढा आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतात 20 दशलक्ष मेट्रिक टन टोमॅटोचे उत्पादन झाले होते. तथापि, मुख्य भाज्यांच्या किंमतीत घट झाल्यामुळे देशातील अन्नधान्य चलनवाढीला काहीसा दिलासा मिळू शकतो.
महाराष्ट्रात काय स्थिती
मे आणि जूनमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकाच्या लागवडी झाल्या होत्या. तो माल आता बाजार आला आहे. तसेच आवक वाढली असून, दरांवर त्याचा परिणाम होत असल्याची माहिती टोमॅटो उत्पादक शेतकरी अजित कोरडे यांनी दिली. तर दुसरीकडं कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या शेतमालाची आवक कमी होणं अपेक्षीत होतं. मात्र ते झालं नाही, त्याचा देखील परिणाम दरांवर होत असल्याचे कोरडे म्हणाले. दरम्यान, सध्या टोमॅटोला मिळणारा दर हा उत्पादन खर्चाच्या मानाने खूप कमी. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला असताना दर मात्र कमी मिळत असल्याची माहिती कोरडे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: