Bhandara Agriculture News : यावर्षी राज्याच्या बहुतांशी भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या पावसाचा शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या अतिवृष्टीच्या फटक्यातून काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. आता ती पिकं देखील संकटात सापडली आहेत. अनेक ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात अतिवृष्टी आणि किडींच्या प्रादुर्भावाने भाताच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं या पिकातून आता मजुरीही हाती येण्याची शक्यता नसल्याने शेतकरी हतबल झालं आहेत. दरम्यान, हतबल झालेल्या एका शेतकऱ्यानं आपल्या चार एकर शेतातीतल उभं पीक पेटवून दिलं आहे.


उत्पन्न हाती येण्याची शक्यता नसल्यानं भाताचं पीक दिलं पेटवून


भंडारा जिल्ह्यात जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील इटान इथं हा प्रकार घडला आहे. शेतकरी दादाजी ठाकरे यांनी आपल्या चार एकर शेतात भात पिकाची लागवड केली होती. सुरुवातीला पूर त्यानंतर दुबार पेरणीचे संकट ओढवल्यानं त्यांना सुमारे एक लाखांचा खर्च आला होता. त्यानंतर भातपिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढल्यानं हाती आलेले पीक वाया गेलं होतं. त्यामुळं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असून, चार एकर शेतीतून दहा किलोही तांदूळ पदरात पडण्याची आशा नव्हती. त्यासाठी कापणीसाठी मजुरी द्यायची कोठून? अशा विवंचनेत शेतकरी दादाजी ठाकरे यांनी त्यांच्या शेतातील धान पेटवून दिले आहे.


बीड जिल्ह्यात तुरीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव


बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकरी देखील चिंतेत आहेत. जिल्ह्यामध्ये तुरीचे (Tur) पीक फुलोऱ्यात आलं असतानाच या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या बीड जिल्ह्यामध्ये तुरीचं पीक फुलोऱ्यात आलं आहे. या तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यावर्षी तुरीचे पीक अगदी जोमात आलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र, पिकं ऐन फुलोऱ्यात आलेल्या तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच मर रोगाचाही प्रादुर्भाव होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.


परतीच्या पावसाचा मराठवाड्यासह विदर्भाला मोठा फटका


दरम्यान, सुरुवातील जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. ऑक्टोबर महिन्यात देखील परतीच्या पावसानं काही जिल्ह्यांमध्ये पावसानं थैमान घातलं होतं. यामुळं देखील शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली होती. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फटका बसला आहे. यातून देखील काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहे. या पिकांवर आता रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : मिरचीच्या कीड व्यवस्थापनासाठी युवा शेतकऱ्यानं शोधली भन्नाट आयडिया, शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा नेमकं काय केलं संशोधन?