भंडारा : कोरोना आला अन् ऐन उमेदित नोकरी गेल्यानं तिशीतील तरुण इंजिनियर गावकडं परतला. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील मुंडीपार या छोट्याशा गावातील सिव्हिल इंजिनियर असलेला शुभम आत्माराम टेंभुर्णे आता वडिलोपार्जित शेतीत रमला आहे. नुसता रमलाचं नाही तर, त्यानं वडिलांना पारंपरिक भात पिकाच्या शेतीसह प्रायोगिक शेती करून कमी कालावधीत अधिक आर्थिक उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि त्यात तो यशस्वी झाला. पाऊण एकरात काकडीची लागवड केली असून त्यातून उत्पादन सुरू झालं आहे. तीन महिन्यात तो निव्वळ नफ्यातून दीड लाखांचा मालक होणार आहे. सोबतच पाव एकरात दोडक, कारली आणि चावडीची लागवड केली असून पुढील तीन महिन्यात यातून आणखी दीड लाखांचा नफा तो कमावणार आहे.


बीएससीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगली नोकरी मिळावी यासाठी शुभमनं सिव्हिल इंजिनियरिंग केलं. नोकरीसाठी गाव सोडलं, पण कोरोनामुळे नोकरी गमावल्यानं त्याला गावाकड परत याव लागलं. गावात वडिलोपार्जित पाच एकर शेती असल्यानं बीएससी शिक्षण घेतलेल्या शुभमनं शेती करून आर्थिक प्रगती करायची मनात खूणगाठ बांधली. त्यानंतर त्यानं कृषी विभागाची मदत घेतली आणि शेतात एका एकरात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेवून ड्रीप सिस्टीम बसविली. त्यात मल्चिंग सिस्टीमनं आधुनिक शेती करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं. वडिलोपार्जित पाच एकरापैकी केवळ पाऊण एकरात शुभमनं काकडीची लागवड केली. आता उत्पादन निघायला सुरुवात झाली असून दररोज दीड टन काकडी बाजारात विक्रीसाठी जात आहे. काकडीचं उत्पादन तीन महिन्यांचं असून यावर एकूण 80 हजारांचा खर्च आहे. या तीन महिन्यात शुभमला 2 लाख 20 हजार रुपयांपर्यंत आर्थिक उत्पादन मिळणार असून यात 1 लाख 50 हजारांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे.


काकडीसोबत पाव एकरात त्यानं दोडकं, कारली आणि चवळीची लागवड केली असून पुढील तीन महिन्यात यावर 50 हजारांचा खर्च अपेक्षित असून त्यातून 50 टन उत्पादन मिळणार आहे. पावसाळ्यात हे पीक हातात येणार असल्यानं त्यावेळी दर चांगला मिळतो, त्यामुळं 2 लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. एक एकरात लागवड केलेल्या काकडी, दोडकं, कारली आणि चवळी यातून केवळ सहा महिन्यात 3 लाखांचा निव्वळ नफा शुभमला मिळणार आहे. या खेरीज दोन एकरात पारंपरिक लागवड केलेल्या भात पिकातून सहा महिन्यात 45 क्विंटल धान हातात मिळणार आहे. यावर दोन एकरासाठी 70 हजारांचा खर्च अपेक्षित असून त्यातून 1 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. दोन एकराच्या शेतातील भात पिकाच्या शेतीतून सहा महिन्यात निव्वळ नफा केवळ 30 हजारांचा मिळणार आहे. पारंपरिक भात पिकाची लागवड दोन एकरात असूनही त्यातून सहा महिन्यात केवळ 30 हजारांचा निव्वड नफा मिळणार आहे. तर, केवळ एक एकरात लागवड केलेल्या काकडी, दोडक, कारली आणि चावडीतून सहा महिन्यात तीन लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे.


छोट्याशा मुंडीपार गावात पहिल्यांदाच काकडीचं उत्पादन घेण्याचं धाडस शुभमनं केलं आणि त्यात तो यशस्वी झाला. यामुळं आता गावातील अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडं वाळवत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.


एकूण शेती - पाच एकर
लागवड - साडे तीन एकरात
पडीक शेती - दीड एकर


दोन एकरात - भात पीक लागवड
एक एकरात - काकडी, दोडक, कारली, चवडी
अर्धा एकरात - आंबा


एक एकरापैकी पाऊण एकरात काकडीची लागवड


आतापर्यंत 40 हजारांचा खर्च आला असून पुढील दिवसात आणखी 40 हजारांचा खर्च अपेक्षित आहे.


आतापर्यंत अडीच टण काकडी तोडून बाजारात विक्री झाली आहे. यात 8 ते 10 रुपये किलोंचा दर मिळाला असून त्यातून 25 हजार रुपये मिळाले आहे.


पुढील अडीच महिने काकडी निघणार असून दररोज दीड टन काकडी बाजारात विक्रीसाठी जाण्याची अपेक्षा आहे.


उन्हाळ्यात काकडीची मागणी मोठ्या प्रमाणत राहणार असल्यानं दर 15 ते 20 रुपये किलो मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यातून 2 लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न होईल.


या तीन महिन्यात 80 हजारांचा खर्च होणार असून उत्पन्न 2 लाख 25 हजार रुपयांपर्यंत होणार आहे. तीन महिन्यांचा 80 हजारांचा खर्च वजा केल्यास निव्वळ उत्पन्न हे 1 लाख 60 हजारांचा घरात राहणार आहे.


पाव एकरात दोडक, कारली, चवळीची लागवड


यावर खर्च 50 हजारांचा अपेक्षित आहे.


हे पीक पावसाळ्यात निघणार असल्यानं ते 50 टण निघण्याची अपेक्षा आहे.


त्यावेळी दर चांगला मिळेल, त्यामुळं 2 लाखांचं उत्पन्न मिळणार असून खर्च वजा केल्यास तीन महिन्यात निव्वळ उत्पन्न 1 लाख 50 हजारांचा अपेक्षित आहे.


दोन एकरात पारंपरिक भात पिकाची लागवड


सहा महिन्यानंतर उत्पादन निघेल. त्यावर प्रती एकर 35 हजार प्रमाणे दोन एकरात 70 हजारांचा खर्च लागणार आहे. दोन एकरात 45 क्विंटल धान निघणार असून त्यातून 1 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. याचाच अर्थ खर्च 70 हजारांचा कमी केल्यास हातात केवळ 30 हजार मिळणार.


एक एकरातील बागायती शेतीतून सहा महिन्यात निव्वळ उत्पन्न 3 लाखांचे तर, पारंपरिक भाताच्या दोन एकरातून सहा महिन्यात केवळ 30 हजारांचे उत्पन्न.